Chhatrapati Sambhajinagar Crime News | बिबट्याच्या हल्ल्यात 3 वर्षीय चिमुरडी जागीच मृत्यू, घटनेने परिसरात हळहळ

Jalgaon Crime (2)

छत्रपती संभाजीनगर : Chhatrapati Sambhajinagar Crime News | बिबट्याच्या हल्ल्यात ३ वर्षीय चिमुरडी जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ऋतुजा सचिन कर्डक (वय तीन वर्षे, रा. तांदुळवाडी, गंगापूर) असे ठार झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (दि. २८) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास बिरोळा गावाजवळील वळण शिवारात (ता- वैजापूर) घडली.

वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मृत ऋतुजा आपल्या आजोळी (वळण शिवार) किरण सोनवणे यांच्याकडे आली होती. दरम्यान, सायंकाळी सात वाजताच्या सुमारास ऋतुजा गट नं. ७७ मधील शेतवस्तीवर असलेल्या घराजवळ होती. यावेळी अचानक बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. यात ती गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. दरम्यान, मुलीच्या ओरडण्याचा आवाज येताच कुटुंबातील सदस्यांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने पळ काढला. जखमी अवस्थेत ऋतुजाला कुटुंबीयांनी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे, गणेश पैठणकर, रणजित चव्हाण यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. दरम्यान, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी रात्री शेतवस्तीवर दाखल झाले. पाहणी करून घटनेचा पंचनामा करण्यात आला. झालेला हल्ला हा हिंस्र प्राण्याचाच होता, अशी माहिती वनपाल सुरेश शेळके यांनी दिली आहे. परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावल्याची ही तिसरी घटना असून, या घटनेमुळे शेतवस्तीवर राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

You may have missed