Chitra Wagh On Sushma Andhare | पुण्यातील गणेशोत्सवाबाबतच्या ‘त्या’ टिकेवरून चित्रा वाघ यांचा सुषमा अंधारेंवर निशाणा; म्हणाल्या – ‘उगाच कोणाची नावं घेऊन मला माझं तोंड….’ (Videos)

चित्रा वाघ यांनी केलं पुनीतदादांचं कौतुक; म्हणाल्या – ‘पुनीतकडून मंडळांना मदतीचा हात मिळाल्याने पुन्हा एकदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतोय’
पुणे: Chitra Wagh On Sushma Andhare | हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati) दर्शनसाठी आज (दि.१०) भाजप नेत्या चित्रा वाघ आल्या होत्या. यावेळी त्यांनी बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर महायुतीच्या नेत्यांचे आणखी बळ वाढो, ही सदिच्छा व्यक्त केली. यावेळी ट्रस्टचे उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीतदादा बालन (Punit Balan) यांनी वाघ यांचे स्वागत करत सन्मान केला. (Bhau Rangari Ganpati)

यावेळी माध्यमांशी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, दरवर्षी मी याठिकाणी येत असते आणि एक नवी ऊर्जा घेऊन वर्षभराची ऊर्जा मी गणरायाकडून घेऊन जात असते. मला माझ्या भावाचा पुनीतचा अगदी सार्थ अभिमान आहे. सगळ्या मंडळाचे कार्यकर्ते आवर्जून सांगतात, प्रश्न पडला होता की गणेशोत्सव साजरा करावा की न करावा. मात्र, पुनीतदादा बालन यांच्या माध्यमातून मदतीचा हात मिळाल्याने पुन्हा एकदा जोरात पुण्याच्या गल्लीबोळात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे.
पुनीतच्या मागची इडा पिडा जावो, गणरायाने अधिकचे बळ पुनीतला द्यावं, की जेणेकरून तो आणखीन चांगली सेवा करू शकेल, अशी गणरायाकडे मागणी केली असल्याचं त्यांनी सांगितलं.
शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी पुनीत बालन यांच्याबाबत केलेल्या टीकेवर माध्यमांनी प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, आज उगाच कोणाची नावं घेऊन मला माझं तोंड विटाळवायचं नाही. गणपती बाप्पा सगळ्यांनाच सद्बुद्धी देऊ दे , तो जेवढं करतोय कणभर तर कोणी करावं आणि मग बोलावं.
जो करतोय त्याला प्रोत्साहन देणं गरजेचे असतं. ज्याने तो आणखीन जोमानं काम करेल. पाय खेचणं किंवा वाट्टेल तसं बोलणं हे तुम्ही सर्वजण पाहताय, जो बाप्पाची चांगली सेवा करतोय त्यांना विचारा ज्यांच्यासाठी काम करतोय, ते तुम्हाला सांगतील की पुनीत काय काम करतोय, असे चित्रा वाघ म्हणाल्या.