Crime News RJ | स्वत:च्याच हॉटेलमध्ये झोपलं मॅरीड कपल, पहाटे पत्नीला जाग आली अन् धक्काच बसला, पतीचा मृतदेह स्कार्फच्या मदतीने पंख्याला लटकलेला

राजस्थान : Crime News RJ | हॉटेल मालक असलेल्या तरुणाने त्याच्याच हॉटेलच्या खोलीमध्ये गळफास लावून जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. गळफास लावून घेणाऱ्या हॉटेल व्यावसायिकाचे नाव अतुल श्यामसिंग शाक्य आहे. अतुल शाक्य अनेक वर्षांपासून हॉटेल चालवत होता. हॉटेल व्यावसायिकाच्या पत्नीने पतीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेमध्ये बघितल्यानंतर तिने पोलिसांना बोलावले, यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह फासावरून खाली उतरवला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला.
अधिक माहितीनुसार, अतुल शाक्य हा करौलीच्या टोडाभीम भागात मेहंदीपूर बालाजीच्या तीन पहाड भागात हॉटेल चालवत होता. अतुल आणि त्याची पत्नी याच हॉटेलमध्ये राहत होते. बुधवार (दि.९) रात्री १२ वाजताच्या सुमारास अतुल शाक्य त्याच्याच हॉटेलमध्ये पत्नीसोबत झोपला होता. मध्यरात्री ३ वाजता पत्नीला जाग आली असता अतुल बेडवर नव्हता म्हणून तिने आजूबाजूला पाहिले, तेव्हा समोरचं दृश्य पाहून तिची झोपच उडाली. अतुलचा मृतदेह स्कार्फच्या मदतीने पंख्याला लटकलेला होता.
या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. हॉटेल व्यावसायिकाने आयुष्य संपवण्याचे टोकाचे पाऊल का उचलले ? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.