Dapodi Pune Crime News | पुणे : दापोडीच्या भाई आणि डॉनमध्ये ‘पंगा’ ! एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन दिली धमकी, पोलिसांनी दोघांनाही टाकले ‘आत’

पुणे : Dapodi Pune Crime News | दापोडीचा मी भाई आहे, असे म्हणणार्याला दुसर्याने मी दापोडीचा डॉन आहे, डॉन झुकता नही असे म्हणून पंगा घेतला. दोघांनी एकमेकांना मारहाण करुन परिसरात दहशत पसरवली. तेव्हा पोलिसांनी दोघांसह त्याचा एका साथीदारालाही आत टाकले.
याबाबत सलमान अकबर शेख (वय २६, रा. बापू काटेचाळ, गुलाबनगर, दापोडी) याने दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी संजय राजू पातारे (वय २४, रा. आबा काटे चाळ, बुद्ध विहाराशेजारी, दापोडी) याला अटक केली आहे. हा प्रकार दापोडीतील त्रिरतन लॉन्ससमोर १० एप्रिल रोजी मध्यरात्री दीड वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा मॅकेनिक आहे. काम संपल्यावर तो घरी जात होता. त्यावेळी त्याच्या तोंड ओळखीचा संजय पातारे याने जुन्या भांडणाच्या कारणावरुन सलमान याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. त्याच्याजवळ असलेला कोयता हवेत फिरवून मदतीला येणार्या लोकांना ‘‘खबरदार कोणी मध्ये आला तर मी दापोडीचा डॉन आहे. डॉन झुकता नही, झुकाता है साला,’’ असे म्हणत लोकांना धमकावले. पोलीस उपनिरीक्षक देशमुख तपास करत आहेत.
त्याविरोधात संजय राजू पातारे (वय २४, रा. आबा काटे चाळ, दापोडी) याने दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सलमान अकबर शेख (वय २६) आणि सत्यम गणेश जाधव (वय २०, रा. गुलाबनगर, दापोडी) यांना अटक केली आहे.
फिर्यादी संजय पातारे हा मजुरी काम करतो़ काम संपवून तो घरी जात असताना वाटेत त्याच्या तोंड ओळखीचा सलमान व त्याचा मित्र सत्यम यांनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जिवे मारण्याची धमकी देऊन सलमान याने कोयता हवेत फिरवून लोकांना म्हणाला की, ‘‘खबरदार कोणी मध्ये आला तर मी दापोडीचा सलमान भाई आहे, भाईशी पंगा तो कर दुंगा नंगा’’ असे म्हणत लोकांना धमकावले. पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करीत आहेत.