Deccan Pune Accident News | भरधाव वेगाने जाणार्या दुचाकीस्वार पडले डेक्कनवरील गरवारे अर्धभुयारी मार्गात; दोघे गंभीर जखमी, मध्यरात्रीची घटना (Video)
पुणे : Deccan Pune Accident News | मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीवर भरधाव जात असताना वळताना नियंत्रण सुटून दोघे जण दुचाकीसह डेक्कन येथील गरवारे अर्धभुयारी मार्गात पडले. या घटनेत दोन तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
तन्मय संदीप राऊत (वय २३, रा. श्री रेसिडन्सी, उत्तमनगर) आणि महेश अनंता इंगळे (वय २८, रा. इंगळे हाईटस, उत्तमनगर) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत बीट मार्शल जगदीश हिरेमठ यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा अपघात गरवारे अर्धभुयारी मार्गावर मध्यरात्री पाऊण वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तन्मय राऊत आणि महेश इंगळे हे दोघे नोकरी करतात. तन्मय राऊत हे महेश इंगळे यांना अॅक्टीव्हावर घेऊन मध्यरात्री पाऊण वाजण्याच्या सुमारास जंगली महाराज रोडवरुन वेगाने डेक्कन जिमखाना येथे आले. फर्ग्युसन कॉलेज रोडला वळण्यासाठी गरवारे अर्धभुयारी मार्गावरील उजवीकडील पुलावर वळले. पण, त्यांचा वेग इतका होता की, पुलावर त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व ते संभाजी महाराज पुतळ्याच्या पाठीमागील बाजुस पुलाचे रेलिंग तोडून दुचाकीसह खाली पडले.
या अपघाताची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला नागरिकांनी कळविली. त्यानंतर बालगर्धव रंगमंदिर येथील बीट मार्शल जगदीश हिरेमठ व त्यांचे सहकारी दादानवरु हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी लोकांच्या मदतीने तन्मय राऊत आणि महेश इंगळे यांना सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. सहायक पोलीस निरीक्षक गणेश जाधव तपास करीत आहेत.
