Delhi Crime News | ‘जेवण बनवलंय, ते घ्या…’, डॉक्टर पतीला अखेरचा मेसेज; 29 वर्षीय महिला शिक्षिकेचा घरात आढळला मृतदेह

दिल्ली : Delhi Crime News | २९ वर्षीय महिला शिक्षिकेचा राहत्या घरामध्येच मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मी आता पतीचे टोमणे सहन करू शकत नाही, तो माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये दोष शोधतो, असा व्हाट्सअप मॅसेज आई-वडील आणि भावाला पाठवत शिक्षिकेने गळफास घेत जीवन संपवल्याची घटना घडली आहे. अन्विता शर्मा (वय-२९)असे आत्महत्या केलेल्या या महिला शिक्षिकेचे नाव आहे. अन्विता शर्मा या दिल्लीच्या केंद्रीय विद्यालयात शिक्षिका होत्या.
अन्विताने तिच्या व्हाट्सअप मेसेजच्या शेवटच्या ओळीमध्ये तिच्या वेदना आणि दु:ख व्यक्त केले आहे. सासरच्या लोकांना फक्त घ्यायचं माहिती आहे असा उल्लेख त्यांनी मेसेजमध्ये केला आहे. ‘मी जेवण बनवलं आहे, गौरव कौशिक, कृपया ते घ्या…’, असेही पतीला उद्देशून अन्विता यांनी शेवटची ओळ लिहिली आहे.
अन्विताच्या कुटुंबाने गौरव कौशिक आणि त्याच्या कुटुंबावर अन्विताचा हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी गौरव कौशिक, त्याचे वडील सुरेंद्र शर्मा आणि आई मंजू या तिघांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ८५, ८० (२), ११५ (२), ३५२, आणि हुंडा प्रतिबंधक कायदा, १९६१ च्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहितीनुसार, कौशिक आणि अन्विता यांचे लग्न १२ डिसेंबर २०१९ रोजी झाले होते. त्यांना चार वर्षांचा मुलगा आहे. अन्विता केंद्रीय विद्यालयात पीजीटी फाईन आर्ट्सच्या शिक्षिका होत्या. ऑक्टोबर२०१९ पासून त्या केंद्रीय विद्यालयात शिकवत होत्या. अन्विताने व्हाट्सअप मेसेजमध्ये म्हंटलेय की, ‘ त्यांनी माझ्या नोकरीशी लग्न केले, माझ्याशी नाही. माझ्या पतीला एक सुंदर, कष्टाळू पत्नी हवी होती. मी माझ्या परीने जे काही करता येईल ते केले, पण ते कधीच पुरेसे नव्हते. त्यांना अशी व्यक्ती हवी होती जी फक्त सासरच्या लोकांवर लक्ष केंद्रित करेल, पण माझे आई-वडील आणि भाऊ माझ्यासाठी तितकेच महत्त्वाचे होते.
गेल्या पाच वर्षांत, माझ्या नवऱ्याने जितका त्रास दिला तितका कोणतीही सासू मला देऊ शकली नसती, तो माझ्या प्रत्येक कामात दोष शोधायचा. सासरच्यांना फक्त काम करणारी मोलकरीण हवी होती. आनंदी असल्याचे नाटक करून मी कंटाळले आहे. माझ्या पतीला माझे बँक खाते, चेकबुक आणि सर्वकाही उपलब्ध आहे. कृपया माझ्या मुलाची काळजी घ्या. मी या जगात माझ्या मुलाला सर्वात जास्त प्रेम करते आणि मला तुम्ही त्याला तुमच्यासोबत ठेवावे असे वाटते. तो त्याच्या वडिलांसारखा होऊ नये, अशी माझी इच्छा आहे’, असे अन्विता तिच्या मेसेजमध्ये म्हंटले आहे.
रविवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास कौशिक आणि त्यांचा मुलगा बाहेर गेले होते, तेव्हा ही घटना घडली. अन्विताचा मॅसेज पाहून तिच्या कुटुंबाने तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या कॉलला उत्तर मिळाले नाही. त्यानंतर कौशिकला संपर्क केला असता कौशिक घरी परतला तेव्हा दरवाजा आतून बंद होता, त्यामुळे त्याने घरात प्रवेश करण्यासाठी खिडकीचे ग्रिल तोडले, अशी माहिती इंदिरापुरमचे एसीपी अभिषेक श्रीवास्तव यांनी दिली आहे.