Devendra Fadnavis | छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो जोडणीस मान्यता

Devendra Fadnavis | Chhatrapati Shivaji Maharaj International Airport to Navi Mumbai International Airport Metro Link Approved

भूसंपादनासह सर्व परवानग्यांची कार्यवाही प्रकल्प सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : Devendra Fadnavis | छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान मेट्रो मार्गिका ८ च्या ३५ किलोमीटरच्या जोडणीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यासोबतच ६६ किलोमीटर लांबीचा नाशिक शहर परिक्रमा मार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्यास आणि गडचिरोली जिल्ह्यात खनिज वाहतुकीसाठी नवेगाव मोर ते सुरजागड या चार पदरी सिमेंट काँक्रिट महामार्गाच्या सुधारित आखणीस मान्यता देण्यात आली. या महामार्गामुळे जिल्ह्यातील उद्योगांच्या विकासाला चालना मिळणार आहे.

पायाभूत सुविधा प्रकल्पाला आवश्यक असलेले भूसंपादन आणि सर्व प्रकारच्या परवानग्या प्राप्त करून घेण्याची कार्यवाही प्रकल्प सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. तसेच कुठलाही पायाभूत सुविधा प्रकल्प भूसंपादनानंतर पुढील तीन वर्षात पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करण्यात यावी. कुठल्याही परिस्थितीत कामे रेंगाळू नये, काम पूर्ण होण्यास विलंब लागल्यास प्रकल्पाच्या खर्चामध्ये वाढ होते. नागपूर ते गोंदिया, भंडारा ते गडचिरोली या समृद्धी महामार्गाच्या विस्तारित कामांना गती द्यावी. प्रकल्प कार्यादेश देतानाच प्रकल्प पुढील तीन वर्षात पूर्ण करण्याची अट करण्यात यावी.

प्रकल्प विहित कालमर्यादेत पूर्ण झाल्यास कंत्राटदाराला प्रोत्साहन मूल्य आणि विहित कालावधीपेक्षा जास्त वेळ लागल्यास दंडाची व्यवस्था असलेली ‘ ऑटो मोड’ वरील यंत्रणा विकसित करावी. गडचिरोली जिल्ह्यातील महामार्गाचे काम करीत असताना रस्त्याच्या बाजूला गॅस वाहिनीसाठी जागेची उपलब्धता असल्याची खात्री करावी. भविष्यात सुरजागडपर्यंत गॅस वाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यासाठी आतापासून जागेची तरतूद महामार्गाच्या बाजूला करण्यात यावी, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी. गुप्ता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिल गायकवाड, महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित आदी उपस्थित होते.

बैठकीमध्ये अपर मुख्य सचिव (सार्वजनिक बांधकाम विभाग) मनीषा म्हैसकर आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सादरीकरण केले.



पायाभूत प्रकल्पांविषयी…

• छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मेट्रो लाईन 8 जोडणीस मान्यता.
• मेट्रो मार्गाची एकूण लांबी 35 किलोमीटर, भूमिगत मार्ग 9.25 किलोमीटर, उन्नत मार्ग 24.636 किमी, एकूण 20 स्थानके, 6 स्थानके भूमिगत, 14 स्थानके उन्नत
• छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2 स्थानक ते घाटकोपर (पूर्व) पर्यंत भूमिगत स्थानके.
• घाटकोपर (पश्चिम) स्थानक ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल दोन स्थानकापर्यंत उन्नत स्थानके, दोन स्थानकांतील सरासरी अंतर 1.9 किलोमीटर.
• 30.7 हेक्टर भूसंपादनाची आवश्यकता, भूसंपादनासाठी 388 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी एकूण 22 हजार 862 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित.

-कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर परिक्रमा मार्गाची निर्मिती, मार्गाची एकूण लांबी 66.15 किलोमीटर, या प्रकल्पासाठी एकूण 3 हजार 954 कोटीच्या खर्चास मान्यता. या प्रकल्पाला विशेष बाब म्हणून 50 टक्के भूसंपादन झाल्यास कार्यादेश देण्याचा निर्णय.

-गडचिरोली जिल्ह्यातील खनिज वाहतुकीसाठी नवेगाव मोरे – कोनसरी – मूळचेरा – हेदरी – सुरजागड महामार्गाच्या सुधारित 85.76 किलोमीटर लांबीस मान्यता, चार पदरी सिमेंट काँक्रिटकरणाचा महामार्ग.

You may have missed