Devendra Fadnavis | मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून गावांच्या समृद्धीची दिशा मिळेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान शीर्षक गीत लोकार्पण कार्यक्रम
नागपूर : Devendra Fadnavis | राज्यात मागील काही दिवसात झालेल्या पूर परिस्थितीमुळे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अंमलबजावणीत अडथळा निर्माण झाला होता. मात्र आता नव्याने अभियानाला सुरुवात करण्यात आली असून या अभियानाच्या अंमलबजावणीतून गावांच्या समृद्धीची दिशा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
विधान भवन येथील मंत्रिपरिषद सभागृहात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान शीर्षक गीत लोकार्पण कार्यक्रम पार पडला. यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सरपंच, ग्रामविकास अधिकारी, गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मागील दहा वर्षात राज्यामध्ये कुठल्याही अभियानाची यशस्वीता बघितली, तर त्यामध्ये लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे निदर्शनास येते. कुठलेही अभियान लोकसहभागाशिवाय यशस्वी होत नाही. जलयुक्त शिवार अभियान हे त्याचे मूर्तीमंत उदाहरण आहे. जलयुक्त शिवार अभियानामुळे जलसाक्षरता वाढून राज्य जलसंपन्न होण्यास मदत झाली. जलयुक्त शिवार अभियानाच्या अंमलबजावणीतून महाराष्ट्र ‘ रोल मॉडेल’ म्हणून देशात पुढे आले. यासोबतच नरेगा ११ कलमी कार्यक्रम, मागेल त्याला शेततळे अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात येत आहे. लोकसहभागातून हे अभियान यशस्वी करावे. ग्रामपंचायत डिजिटल, स्वयं अर्थपूर्ण असाव्यात, तसेच गावांचा पर्यावरणपूरक विकास करण्यात यावा, यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान महत्त्वाचे ठरणार आहे. ग्रामसभांना या अभियानासाठी सहकार्य करणारे कलाकार उपस्थित राहणार आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
अभियानाच्या अंमलबजावणीतून गावांमध्ये समृद्धीची स्पर्धा निर्माण होईल. त्यामुळे सर्व ग्रामपंचायतींनी अभियानात सक्रिय सहभाग घेऊन अभियान यशस्वी करावे, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.
ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी अभियानाची पार्श्वभूमी सांगितली. ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला अभिनेते भारत गणेशपुरे, संदीप पाठक, पृथ्वीक प्रताप, अभिनेत्री शिवाली परब, विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
थोडक्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान..
ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या स्तरावर केंद्र, राज्य शासनाच्या सर्व योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी स्पर्धा व्हावी, या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पंचायतराज संस्थांना प्रोत्साहन देऊन त्यांची कार्यक्षमता वाढावी, यासाठी तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरांवर स्पर्धात्मक स्वरुपात सन 2025-26 या वर्षापासून “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” राबविण्यात येत आहे.
ग्रामपंचायत सक्षम, सुशासनयुक्त, जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव निर्माण करणे, मनरेगा व इतर योजनांशी अभिसरण, उपजिविका विकास व सामाजिक न्याय, लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ हे या अभियानाचे मुख्य घटक आहेत. या अभियानांतर्गत विविध स्तरांवर पुरस्कार दिले जाणार आहेत.
