Donald Trump Tariff | अमेरिका भारतावर 26 टक्के आयात शुल्क लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय

नवी दिल्ली ः Donald Trump Tariff | अमेरिकेकडून भारतावर २६ टक्के आयात शुल्क लावण्यात येणार आहे, अशी मोठी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. अमेरिका प्रमुख प्रतिस्पर्धी देश असलेल्या चीनवर ३४ टक्के आयात शुल्क आकारणार असल्याचे समजते. तर अमेरिकेच्या निर्णयाचा फटका जगभरातल्या देशांना बसण्याची शक्यता आहे.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयामुळे मोठा फटका भारतालाही बसण्याची शक्यता आहे. या आयात शुल्कात वाढ केल्याने कृषी, मौल्यवान खडे, रसायन, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्मिती आणि यंत्र निर्मिती क्षेत्रांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
औषध निर्माण, वैद्यकीय साहित्य निर्मिती क्षेत्रावर सुद्धा परिणाम होईल. अमेरिका सरकारने आयात शुल्कातील बदलाच्या अनुषंगाने २ एप्रिलची मुदत निश्चित केली होती. दरम्यान, भारत आणि अमेरिकेतील व्यापार आधीच अनेक मुद्द्यांवरून तणावपूर्ण आहे. या आयात शुल्कामुळे भारतीय कंपन्यांना अमेरिकेत व्यवसाय करणे महागात पडू शकते. परंतु, ट्रम्प यांचा दावा आहे की, या आयात शुल्कामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित केले जाईल.
डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या घोषणेनुसार आता अमेरिका चीनकडून ३४ टक्के, युरोपियन युनियनकडून २० टक्के, जपानकडून २४ टक्के, दक्षिण कोरियाकडून २५ टक्के, स्वित्झर्लंडकडून ३१ टक्के, युनायटेड किंग्डमकडून १० टक्के, तैवानकडून ३२ टक्के, मलेशियाकडून २४ टक्के आणि भारताकडून २६ टक्के टॅरिफ वसूल करणार आहे.