Dr. Madhavrao Gadgil Passed Away | पर्यावरणाचा महामेरु प्रा. माधव गाडगीळ यांचे निधन
पुणे : Dr. Madhavrao Gadgil Passed Away | पर्यावरण क्षेत्रात हिमालयाऐवढे काम उभे करणारे, पर्यावरण आणि परिसंस्था वाचवा असे सांगणारे पर्यावरण शास्त्रज्ञ प्रा. माधव गाडगीळ (वय ८३) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी रात्री उशिरा निधन झाले. त्यांचे पार्थिव दिवसभर त्यांच्या पाषाण येथील पंचवटीमधील निवासस्थानी ठेवण्यात येईल. त्यानंतर दुपारी ४ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
माधव गाडगीळ यांच्या मागे मुलगी, मुलगा, जावई, सुन आणि नाती असा परिवार आहे. माधव गाडगीळ यांच्या पत्नीचे गेल्या वर्षी निधन झाले.
माधव गाडगीळ यांचा जन्म २४ मे १९४२ रोजी पुणे जिल्ह्यात झाला. शालेय शिक्षण मॉडर्न विद्यालयात पूर्ण केल्यानंतर त्यांनी पदवी शिक्षण पुणे विद्यापीठातून तर पदव्युत्तर शिक्षण मुंबई विद्यापीठाून पूर्ण केले. ७० च्या दशकात हार्वड विद्यापीठात गाडगीळ यांनी गणितीय पर्यावरणशास्त्र या विषयात पीएचडी पदवी प्राप्त केली. एका जीवशास्त्र विद्यार्थ्याला मॅथेमॅटिकल इकोलॉजी मध्ये प्रथमच अशी पदवी विद्यापीठाने दिली होती.
भारतात आल्यावर ते इंडियन इस्टिट्युट ऑफ सायन्स मध्ये रुजू झाले. तेथे त्यांनी १९७३ ते १९८३ कालावधीत इकोलॉजी क्षेत्रात उल्लेखनीय काम केले. १९८३ साली त्यांच्या नेतृत्वाखाली सेंटर फॉर इकोलॉजीकल सायन्सची स्थापना करण्यात आली. उत्क्रांती, पर्यावरणशास्त्र संवर्धन जीवशास्त्र आणि पर्यावरणीय इतिहास मध्ये काम करत असताना गाडगीळ यांनी २२५ च्या वर शास्त्रीय लेख प्रसिद्ध आहेत.
वेस्टर्न घाट म्हणजेच सह्याद्री मध्ये माधव गाडगीळ यांनी तिथल्या स्थानिक समाजाला बरोबर घेऊन जवळपास ४ दशके काम केले. तसेच ईशान्य भारतातील जैवविविधता पण तिथल्या लोकांना बरोबर घेऊन अभ्यासली.
बायोलॉजीकल डायव्हरसिटी अॅक्ट २००२ मध्ये त्यांची प्रमुख भूमिका बजावली.
पश्चिम घाट (सह्याद्री) परिसर समिती २००९ मध्ये माधव गाडगीळ यांनी अध्यक्ष म्हणून काम बजावले. या समितीमुळे पश्चिम घाटामधील जैव विविधता ही लोकांना बरोबर घेऊन कशी वाचविता येईल, ह्या करता अत्यंत उत्तम मार्गदर्शन केलेले आहे. अनेक पुस्तकांचे लेखन करणारे आणि अनेक पर्यावरण आणि स्थानिक समाजाबरोबर काम करणारे ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ म्हणून त्यांची ओळख होती.
माधव गाडगीळ यांना मानाचा समजला जाणारा शांतीस्वरुप भटनागर पुरस्काराने गौरविले गेले होते. भारत सरकारने त्यांचा पद्मश्री आणि पद्यभूषण पुरस्कार देऊन सन्मान केला होता.
