Dr Neelam Gorhe | विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सिम्बॉयसिस शाळेत मतदानाचा हक्क बजावला
पुणे : Dr Neelam Gorhe | महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानासाठी सिम्बॉयसिस शाळेतील मतदान केंद्रावर सकाळी साडेदहाच्या सुमारास आपला मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी माध्यमांशी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या,
“प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावणे हे लोकशाहीचे मूलभूत कर्तव्य आहे. त्यानुसार सर्वांनी मतदान जरूर करावे. पुणे शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे.”
त्या पुढे म्हणाल्या की, प्रशासनाने एकूण व्यवस्था चांगली केली असली तरी ज्येष्ठ नागरिकांसाठी पायऱ्यांवरून जाण्याची योग्य सोय दिसत नाही. या मतदान केंद्रावर मतदार यादीतील अनेक ज्येष्ठ नागरिकांचा समावेश केला आहे, तर इतर मतदारांचे केंद्र विद्याभवन शाळेतच ठेवण्यात आले आहे. तरीही मतदानाचा हक्क बजावणे हे सर्वांत महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.
कालपर्यंत राज्यात निवडणुकीचे वातावरण अशांत होते, पण आता लोकांमध्ये मतदानाची जाणीव निर्माण झाली आहे. मतदार कोणत्याही दबावाशिवाय निर्भयपणे मतदान करतील, याची खात्री आहे, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केल्यानंतर त्यांनी सांगितले की, बहुतांश ठिकाणी उत्साहाचे वातावरण दिसले. मात्र, काही केंद्रांवर मोबाईल आत नेण्याबाबत कडक नियम लावले जात असल्याने मतदारांना त्रास होत आहे. मोबाईल ठेवण्याची योग्य व्यवस्था करणे आवश्यक आहे, कारण मतदार मोबाईल कुठे ठेवायचा म्हणून मतदान करत नाहीत आणि काहीजण केंद्र सोडून परत जात आहेत, असं त्यांनी नमूद केले.
