E Bike Taxi Service | महाराष्ट्रात सुरू होणार ई-बाईक टॅक्सी सेवा ! राज्य परिवहन विभागाने आखले धोरण

Bike-Taxis

मुंबई : E Bike Taxi Service | ई-बाईकला प्रमोट करण्याच्या हेतूने राज्य परिवहन विभागाकडून महाराष्ट्रात ई-बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत बाईक टॅक्सीच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या निर्णयामुळे नागरिकांना टॅक्सी, रिक्षासह आता बाईक सेवेची सुविधा देखील मिळणार आहे.

अंतराची मर्यादा 15 किलोमीटर

याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, ई बाईकचा उपक्रम परिवहन विभाग राबवणार आहे. सिंगल प्रवाशांना विनाकारण रिक्षा, टॅक्सीसाठी तिप्पट भाडे द्यावे लागते. ही गैरसोय पाहता बाईक टॅक्सीचा निर्णय घेण्यात आला आहे. आता प्रवाशांना पूर्ण महाराष्ट्रात बाईक टॅक्सीने प्रवास करता येईल. बाईक टॅक्सीचे अंतर 15 किलोमीटर इतके मर्यादित ठेवण्यात आले आहे.

50 बाईक एकत्रित करून देणाऱ्या कंपनीलाच काम

सरनाईक म्हणाले की, 50 बाईक एकत्रित करून ती सेवा देणार्या कंपनीलाच मान्यता दिली जाईल. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नियमावली तयार केली जात आहे. पावसाळ्यात प्रवासी भिजू नये यासाठी त्या बाईकला कव्हर असेल अशांनाच परवानगी दिली जाईल. इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी ई बाईक टॅक्सीलाच परवानगी दिली आहे. प्रदूषणमुक्त प्रवास व्हावा यासाठी ई बाईक टॅक्सी चालवण्यात येईल. राज्यात लवकरच ही सेवा सुरू होईल.

10 हजार रूपये अनुदान देण्याचा विचार

या सेवेला प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याने त्याबाबत धोरण आखले जात आहे. प्रवाशांना कमी दरात ही सेवा मिळेल यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. रिक्षा, टॅक्सी चालकांच्या मुलांना 10 हजारांचं अनुदान देण्याचा विचार सुरू आहे. जर रिक्षा, टॅक्सी चालकांच्या मुलाने ई बाईक चालवायला घेतली तर त्यांना 10 हजार रूपये अनुदान देऊन इतर रक्कम कर्जरूपी त्यांना मिळेल. यामुळे राज्यात 20 हजार रोजगार निर्माण होतील असा विश्वास ही सरनाईक यांनी व्यक्त केला.

You may have missed