E Challan Scam | बनावट ई-चलनाद्वारे नागरिकांची होतेय आर्थिक फसवणूक; सायबर पोलिसांकडून नागरिकांना आवाहन

पिंपरी : E Challan Scam | वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांच्या वाहनाच्या नावावर ऑनलाइन पद्धतीने ई-चलन टाकले जाते. गेल्या काही वर्षांपासून वाहतूक पोलिस ई-चलन पद्धतीनेच दंडाची आकारणी करीत आहेत. दरम्यान आता नागरिकांची आर्थिक फसणूक करण्यासाठी सायबर चोरट्यांनी ‘ई-चलन’चा नवीन फंडा वापरण्यास सुरुवात केली आहे. (Cyber Crime News)
सायबर चोरटे वाहतूक पोलिसांच्या नावाने नागरिकांच्या मोबाईलवर बनावट चलन पाठवत आहेत. संबंधित मेजेसला फसून नागरिक मेसेजमधील वेबसाइटवर जाऊन पैसे भरत आहेत. हा प्रकार फक्त शहरातच नव्हे, तर ग्रामीण भागातही झपाट्याने पसरत आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
सुरुवातीला नागरिकांना त्यांच्या मोबाइलवर ‘आपल्या गाडीने वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ५०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. पुढील २४ तासांत दंड भरावा; अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल. पेमेंटसाठी खालील लिंकवर क्लिक करा,’ असा मेसेज येतो. मेसेजमध्ये दिलेली लिंक अगदी अधिकृत सरकारी संकेतस्थळासारखी वाटते.
mahatrafficechallan.in,pune-trafficpay.com यासारख्या बनावट लिंकवर क्लीक करताच एक वेबसाईट उघडते. या बनावट साईटवर सुरक्षा चिन्हांचा देखी वापर केला जातो. वाहनचालकांना दंड भर या ऑप्शनखाली कार्ड डिटेल्स, यूपीआय माहिती, मोबाईल नंबर आणि ओटीपी विचारला जातो. ओटीपी देताच संबंधित चालकाच्या खात्यातून रक्कम वळती केली जाते. काहीवेळा एकाच खात्यातून ५० हजरापर्यंत पैसे गेल्याचे निदर्शनास आले आहे.
“चालकांना फसवण्यासाठी वाहतूक ई-चलनाचा मेसेज पाठवला जात आहे. मात्र, वाहतूक विभागाकडून केवळ अधिकृत वेबसाईटवरूनच चलनाची माहिती दिली जाते. कोणत्याही थर्ड पार्टी लिंकवरून, व्हॉट्सअप किंवा ‘एसएमएस’द्वारे चलन पाठवले जात नाही. नागरिकांनी अशा मेसेजवर विश्वास ठेवू नये”, असे आवाहन सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे (Sr PI Ravikiran Kale) यांनी केले आहे.
खऱ्या चलनाची खात्री कशी करावी?
आपल्या वाहनावरील दंड तपासण्यासाठी https://mahatrafficechallan.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. तेथे आपल्या वाहनाचा नंबर टाकून दंडाची खरी माहिती तपासा. जर काही शंका असेल तर स्थानिक पोलीस ठाणे किंवा वाहतूक शाखेशी संपर्क साधा.