Farooq Inamdar On Sadiq Kapoor Death | सादिक कपूर मृत्यु प्रकरणात मला अडकविण्याचे राजकीय षडयंत्र; टिपू पठाणचे आका प्रशांत जगतापच – फारुख इनामदार (Video)
पुणे : Farooq Inamdar On Sadiq Kapoor Death | सादिक कपूर मृत्यु प्रकरणात मला अटक झाली तर महापालिका निवडणुकीत प्रचार करता येणार नाही, त्यामुळे त्यात मला अडकविण्याचे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप प्रभाग ४१ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार फारुख इनामदार यांनी पत्रकार परिषद घेऊन केला.
लष्कर पोलीस ठाण्यात सादिक कपूर यांनी ३० पानी सुसाईड नोट लिहून आपले जीवन संपविले होते. त्यांच्या मुलाच्या तक्रारीवरुन लष्कर पोलिसांनी फारुख इनामदार व इतरांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत फारुख इनामदार यांनी सांगितले की, या प्रकरणातील सादिक कपूर याचा मी आका नाही. उलट त्याला मी वाचविले होते. ट्रॉफिकचे काम दिले होते. व्हायरल झालेली ऑडिओ क्लीप आमच्या वकिलांनी न्यायालयात सादर केली. याप्रकरणात न्यायालयाने मला अंतरिम अटकपूर्व जामीन दिला आहे. त्यामुळे माझ्याविरुद्ध षडयंत्र करणाऱ्याचा डाव धुळीला मिळाला आहे. मला प्रचाराचा मार्ग मोकळा झाला आहे.
सादिक कपूर यांच्याविषयीची जी ऑडिओ क्लीप व्हायरल झाली. त्यात हबीब पटेल हा बोलणारा असून इम्रान शेख ऐकणारा आहे. पोलिसांनी तातडीने हबीब पटेल याला अटक करुन तपास करावा.
टिपू पठाण यांचा आका आपण नसून प्रशांत जगताप हाच आहे, असे सांगून फारुख इनामदार म्हणाले की, मी कधीही टिपू पठाण याच्याबरोबर नव्हतो. उलट विधानसभेला टिपू पठाण याने प्रशांत जगताप यांचा प्रचार केला होता. टिपू पठाण याने आयोजित केलेल्या ईदच्या कार्यक्रमाच्या बॅनरवर प्रमुख पाहुणे म्हणून प्रशांत जगताप यांचा फोटो आहे. त्या कार्यक्रमाला प्रशांत जगताप गेले होते. त्यानंतर याच कार्यक्रमात टिपू पठाण पैसे उधळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. सादिक कपूर याची ३० पानी सुसाईड नोट ही तासाभरात लिहून होत नाही. ही सुसाईड नोट पोलीस आयुक्त, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पाठविली जात नाही़. तर ती प्रशांत जगताप यांना पाठविली जाते आणि ते ती व्हायरल करतात. यामध्येच तुम्हाला राजकीय षडयंत्र दिसून येईल़, असे फारुख इनामदार यांनी सांगितले.
