FASTag Rule News | फास्टॅग नियमांत मोठे बदल; आजपासून होणार अंमलबजावणी, जाणून घ्या

मुंबई : FASTag Rule News | महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातील (एमएसआरडीसी) सर्व टोल नाक्यांवर 1 एप्रिलपासून फास्टॅगद्वारेच टोल वसूल करण्यात येणार आहे. फास्टॅगशिवाय टोल भरणाऱ्या वाहनचालकांना दुप्पट शुल्क भरावे लागणार आहेत. ‘एमएसआरडीसी’ने या संदर्भात काटेकोर अंमलबजावणी सुरू केली आहे.
पूर्वी ‘एमएसआरडीसी’च्या टोल प्लाझावर हायब्रिड पद्धतीने टोल वसुली केली जात होती. रोख रक्कम, स्मार्ट कार्ड, डेबिट कार्ड, पीओएस मशीन किंवा क्यूआर कोडद्वारे टोल स्वीकारला जात होता. तथापि, आता हे सर्व लेन बंद करण्यात आले आहेत आणि पूर्णपणे फास्टॅग लेनमध्ये रूपांतरित करण्यात आले आहेत.
फास्टॅग नसलेल्या वाहनधारकांनी लवकरात लवकर फास्टॅग स्टीकर खरेदी करून आपल्या वाहनावर लावण्याचे आवाहन करण्यात आले. नाहीतर टोल नाक्यावर दुप्पट शुल्क भरावे लागणार आहेत. एमएसआरडीसीच्या नऊ रस्ते प्रकल्पांतर्गत असलेल्या सर्व टोल नाक्यांवर हा निर्णय लागू होईल. त्यामुळे वाहनचालकांनी प्रवासापूर्वी फास्टॅगची वैधता तपासावी आणि टोल भरण्यासाठी तयार राहावे, असे सांगण्यात येत आहे.
‘एमएसआरडीसी’च्या अखत्यारितील पुढील टोल
- वांद्रे वरळी सागरी सेतू
- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि जुना मुंबई-पुणे मार्ग
- मुंबई प्रवेशद्वारावरील 5 टोल नाके
- समृद्धी महामार्गावरील 23 टोल नाके
- नागपूर शहर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पातील 5 टोल नाके
- सोलापूर शहर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पातील 4 टोल नाके
- संभाजीनगर शहर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पातील 3 टोल नाके
- काटोल बायपास
- चिमूर-वरोरा-वणी मार्ग