Female Police Officer Dies Of Heart Attack | दुर्दैवी ! 37 वर्षीय महिला पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू, अचानक चक्कर आली अन्…; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सातारा : Female Police Officer Dies Of Heart Attack | कोयना बिनतारी संदेश यंत्रणा विभागात कार्यरत असणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना मलकापुरात घडली. सत्वशीला सुहास पवार (वय-३७, रा. सातारा) असे मृत्यू झालेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. सकाळी ७ वाजताच्या सुमारास त्यांना चक्कर आल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. (Satara Police News)
अधिक माहितीनुसार, कराड तालुक्यातील शहापूर माहेर व सातारा सासर असलेल्या सत्वशीला पवार या मागील वर्षीपासून कराड शहर पोलिस ठाण्यात कार्यरत होत्या. सद्यःस्थितीत त्या कोयना बिनतारी संदेश यंत्रणा या विभागात प्रतिनियुक्तीवर कर्तव्य बजावत होत्या. यापूर्वी त्यांनी उपअधीक्षक कार्यालयात प्रतिनियुक्तीवर कर्तव्य बजावले होते. त्या मलकापूरमध्ये वास्तव्यास होत्या.
काल सकाळी ७ वाजताच्या सुमारास याच ठिकाणी त्यांना अचानक चक्कर आली. त्यानंतर त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. या दुर्दैवी घटनेनंतर त्यांची उत्तरीय तपासणी येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
साताऱ्यातील संगममाहुली येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक वंदना श्रीसुंदर, सहायक पोलिस निरीक्षक श्रद्धा आमले, तब्बसुम शादीवान, सरिता जाधव यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.