FIR On Santosh Pandit Pune | पुण्यातील रीलस्टार संतोष पंडित याच्याविरुद्ध महिला पत्रकाराच्या विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल
FIR On Santosh Pandit Pune | पुण्यातील टिळक रस्त्यावर महिला पत्रकाराशी कथित गैरवर्तन केल्याप्रकरणी स्वयंघोषित रील स्टार संतोष पंडित याच्याविरोधात पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्वाच्य भाषा वापरणे, कपड्यांवरून अश्लील टिप्पणी करणे आणि इच्छेविरुद्ध मोबाईलद्वारे चित्रीकरण केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी, 30 मार्च रोजी घडल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक येथील अशोक खरात प्रकरणाच्या निषेधार्थ टिळक रस्त्यावरील सर्व महाविद्यालयाजवळ आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनाचे वृत्तांकन करण्यासाठी संबंधित महिला पत्रकार घटनास्थळी गेल्या होत्या. त्यावेळी संतोष पंडित तेथे आल्याचा आणि पत्रकारांवर संताप व्यक्त करत अर्वाच्य भाषेत बोलू लागल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, संतोष पंडित याने महिला पत्रकाराच्या कपड्यांवरून अश्लील टिप्पणी केली, अपमानास्पद नजरेने पाहत अश्लील हावभाव केले, तसेच तिच्या इच्छेविरुद्ध मोबाईलने चित्रीकरण केले. याशिवाय, आंदोलनात सहभागी इतर महिलांकडेही त्याने आक्रमकपणे धाव घेत शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी संबंधित महिला पत्रकाराने दिलेल्या तक्रारीवरून पर्वती पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 75, 78, 352, 351(1) आणि 296 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष महाले करत असून पुढील चौकशी सुरू आहे.
या घटनेनंतर पत्रकारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावरही या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून संतोष पंडितविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
