GBS In Pune | शहरात मागील वर्षी जीबीएसचे 60 रुग्ण आढळले होते; आतापर्यंत आढळले 111 संशयित जीबीएस रुग्ण

31 जणांनाच जीबीएसची लागण झाल्याचे निष्पन्न
पुणे : GBS In Pune | शहरात दरवर्षी गुईनल बॅरे सिंड्रोम अर्थात जीबीएसचे दरवर्षी ६० ते ७० संशयित रुग्ण आढळतात. परंतू मागील महिन्यापासून सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल ते खडकवासला दरम्यानच्या परिसरातच एकाच कालावधीत अनेक रुग्ण सापडल्याने केंद्रापासून महापालिकेपर्यंतची आरोग्य यंत्रणा खडबडून कामाला लागली आहे. दरम्यान, महापालिकेने कमला नेहरू रुग्णालयामध्ये जीबीएससाठी स्वतंत्र कक्ष सुरू केला असून याठिकाणी खाजगी रुग्णालयातील तीन न्यूरॉलॉजिस्ट फिजिशियनने याठिकाणी सेवा देण्याची तयारी दर्शविली असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे (Dr Nina Borade) यांनी दिली.
पुणे शहरात १३ जानेवारीपासून जीबीएसचे संशयित रुग्ण आढळून येउ लागले आहेत. यानंतर पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागातही जीबीएसचे रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांची संख्या शंभरी पार गेली असून एकाचा सोलापूर येथे मृत्यू झाला तर १६ रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत. प्रामुख्याने सिंहगड रस्त्यावरील महापालिकेच्या हद्दीतील राजाराम पूल ते खडकवासलापर्यंतच्या परिसरात सर्वाधिक रुग्ण आढळल्याने, महापालिकेने या परिसरातील ३० हजार कुटुंबांचा सर्व्हे केला आहे. केंद्रीय आरोग्य पथक देखिल येथे दाखल झाले आहे, अशी माहिती डॉ. बोराडे यांनी दिली.
महापालिकेने शहरातील सर्व हॉस्पीटल्स प्रामुख्याने न्यूरो सर्जन असलेल्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटलसोबत संपर्क साधून त्यांच्याकडून मागीलवर्षीत जीबीएस संशयित रुग्णांची माहिती गोळा करायला सुरूवात केली आहे. आज दिवसभरात सात हॉस्पीटल्स कडून मिळालेल्या माहितीमध्ये मागील वषि जीबीएसचे ६० रुग्ण आढळले होते, असे डॉ.बोराडे यांनी सांगितले.
तोपर्यंत सर्वच जीबीएस संशयित रुग्ण
जीबीएस रुग्ण ठरविण्यासाठी रुग्णांच्या तीन ईएमजी, एनसीटी आणि सीएसएफ या तीन टेस्टपैकी घेण्यात याव्यात. यापैकी एक जरी टेस्ट पॉझीटीव्ह आली तर तो जीबीएसचा रुग्ण म्हणून समजण्यात यावा, असा निर्णय वरिष्ठ स्तरावर झाला आहे. त्यामुळे तूर्तास तरी एकाही रुग्णाला जीबीएसचा रुग्ण म्हणणे अवघड ठरत आहे. परंतू एकाच परिसरात मोठ्याप्रमाणावर रुग्ण आढळू लागल्याने पाण्याच्या स्त्रोतांची तपासणीसह रुग्णांच्या रक्त आणि शौचाची तपासणी एनआयव्ही कडून करण्यात येत आहे, अशी माहिती आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी दिली. (GBS In Pune)
शहरी गरिब योजनेतून १३ जानेवारी नंतरच्या प्रत्येक रुग्णाला किमान एक लाख रुपयांची मदत
महापालिकेच्या शहरी गरिब योजनेतून या योजनेस पात्र असलेल्या संशयित जीबीएस रुग्णाला उपचारासाठी दोन लाख रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे. या योजनेस पात्र असलेल्या एका रुग्णाला खर्चासाठीचे पत्रही देण्यात आले आहे. तर या योजनेत न बसणार्या रुग्णाला एक लाख रुपये अर्थसहाय्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतू हे अर्थसहाय्य केवळ १३ जानेवारीनंतर आढळणार्या रुग्णांनाच केले जाणार आहे, अशी माहिती डॉ. नीना बोराडे यांनी दिली.
खाजगी आरओ प्लांटचीही तपासणी
आरोग्य विभागाने शहरात आरओ प्लांटद्वारे पाणी पुरवठा करणार्या खाजगी आरओ प्लांटस्सोबतच, टँकरचालकांच्या पॉईंटस् आणि टँकर व संबधित यंत्रणांची तपासणी करण्यात यावी, असे पत्र पाणी पुरवठा विभागाला दिले. यासोबतच सिंहगड रस्त्यावरील ज्या भागात जीबीएसचे रुग्ण आढळले आहेत, त्या परिसरातील प्रत्येक घरात मेडीक्लोअर या क्लोरीनचा पुरवठा करण्यात येत आहे. आतापर्यंत ६०० बॉटल्सचे वाटप करण्यात आले आहे. नागरिकांनी पाणी उकळूनच गार करून प्यावे हाच पाण्यापासून होणारे आजार दूर ठेवण्याचा उपाय आहे, असे आवाहन डॉ. बोराडे यांनी केले.
सिंहगड रस्ता परिसरातील खाजगी डॉक्टरांची बैठक
महापालिकेच्या आरोग्य विभागाने सिंहगड रस्ता परिसरातील खाजगी प्रॅक्टीस करणार्या डॉक्टरांची बैठक बोलविली. त्यांनी जनजागृती करावी. जीबीएसची लक्षणे असलेला संशयित रुग्ण आढळल्यास कार्डीयाक ऍम्ब्युलन्समधून रुग्ण उपचारासाठी मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये रुग्ण उपचारासाठी पाठवावा,यासह अन्य सूचना त्यांना यावेळी करण्यात आल्या. कमला नेहरू रुग्णालयामध्ये जीबीएस रुग्णांसाठी ६० बेडस्ची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी उपचारासाठी खाजगी रुग्णालयातील तीन न्यूरो सर्जन्सनी सेवा देण्याची तयारी दर्शविली आहे. सध्या कमला नेहरूमध्ये दोन संशयित दाखल झाले असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. तसेच महापालिकेने जीबीएस रुग्णांसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरु केला आहे. या कक्षात फोन क्रम. 020 – 25506800, 020 – 25501269 अथवा 020 – 67801500 वर संपर्क साधावा. ज्याठिकाणी सध्या रुग्ण उपचार घेत आहेत, त्या रुग्णालयांत उपचारासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यासाठी नोडल ऑफीसर्स नेमण्यात आल्याचे डॉ. बोराडे यांनी सांगितले.
पुण्यात जीबीएसची रुग्णसंख्या १११ वर
पुण्यात आतापर्यंत जीबीएस चे १११ संशयित रुग्ण सापडले आहेत. यापैकी २० रुग्ण पुणे महापालिकेच्या जुन्या हद्दीतील आहेत. तर ६६ रुग्ण समाविष्ट गावातील आहेत. तर उर्वरीत रुग्ण पिंपरी चिंचवड आणि अन्य भागातील आहेत. आतापर्यंत यापैकी केवळ ३१ रुग्णांनाच जीबीएस झाल्याचे निदान झाल्याची माहिती राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. (GBS In Pune)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Hindu Garjana Chasak 2025 | हिंदू गर्जना चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा लोगोचे युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते अनावरण;
दि. 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान रंगणार आखाडा (Video)
Pune Metro News | पुणेकरांसाठी गुड न्यूज! ‘या’ मेट्रो मार्गास केंद्र सरकारचा हिरवा कंदील,
वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न