Gold Rate Hike News | गुढीपाडव्यानंतर सोन्याने रचला नवा विक्रम; सोने 1 लाख रुपयांवर जाणार? तज्ज्ञांचे म्हणणे काय, जाणून घ्या

पुणे : Gold Rate Hike News | राज्यात नवीन वर्षाचे स्वागत आनंदात झाले आणि गुढीपाडव्यानिमित्त अनेकांनी सोने खरेदीही केली. काहींना अशी अपेक्षा होती की गुढीपाडव्यानंतर सोन्याचे भाव कमी होतील. तथापि, सोने पुन्हा एकदा तेजीत आले. पाडव्यानंतर दुसऱ्याच दिवशी सोने 1,000 रुपयांनी महागले. त्यामुळे येत्या काळात सोन्याचे भाव काय असतील? याबद्दल चर्चा सुरू आहे.
जर सोन्याचे भाव (Gold Rate) असेच वाढत राहिले, तर अक्षय्य तृतीयेपर्यंत सोन्याचा भाव प्रति तोळा एक लाखांपर्यंत जाण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. तर, सध्याच्या अस्थिर जागतिक परिस्थितीमुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे पाहत आहेत. अनेक देश त्यांच्या सोन्याच्या साठ्यात वाढ करत असल्याने जागतिक बाजारात सोन्याच्या किमती सतत वाढत आहेत. युरोपियन देशांतील महागाई आणि अमेरिका, चीन यांसारख्या देशांतील आर्थिक अनिश्चितता यामुळे सोन्याची मागणी वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 90,000 रुपये होता. दुसऱ्या दिवशी तो 91,000 रुपयांवर पोहोचला. अवघ्या 24 तासांत सोन्याच्या भावात एक हजार रुपयाची वाढ झाली. येत्या काळात सोन्याच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती पुण्यातील अमराळे ज्वेलर्सचे स्वप्नील अमराळे यांनी दिली.
स्वप्नील अमराळे यांनी सांगितले की, काही आठवड्यांत सोन्याचा दर प्रतितोळा एक लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ असल्याचे तज्ज्ञ सांगतात. जर कोणी लग्न किंवा अन्य महत्त्वाच्या प्रसंगांसाठी सोने खरेदी करायचे ठरवत असेल, तर लवकरात लवकर खरेदी करणे फायदेशीर ठरू शकते.
दरम्यान, सध्या लग्नसराई आणि अक्षय तृतीया सारख्या सणांमुळे बाजारात सोन्याची मागणी अधिक आहे. त्यामुळे स्थानिक बाजारात देखील किमती वाढण्याची शक्यता आहे.