Gold Silver Price | US टॅरिफवरून जगात घमासान; सोन्याचा भाव विक्रमी पातळीवर, सध्याचे दर कसे असतील, जाणून घ्या

मुंबई : Gold Silver Price | सध्या जगात टॅरिफवरून (Tariff) घमासान होत असल्याचे दिसत आहे. याचा परिणाम सर्वच व्यवसाय उद्योगांवर होत आहे. यंदा सोन्यानेही विक्रमी उच्चांक गाठला आहे. शुक्रवारी भारतात सोन्याच्या दराने मोठी उसळी घेतली. एकाच दिवसात सोन्याच्या दरात ६,२५० रुपयांची उसळी आली. दिल्लीतही सोन्याच्या दराने विक्रमी उच्चांक पातळी घेतली.
समोर आलेल्या माहितीनुसार, चार दिवसांच्या घसरणीनंतर ९९.५ टक्के शुद्ध सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ९६ हजार रुपयांवर पोहोचला आहे, बुधवारी ८९,७५० रुपये इतका दर होता. ही आतापर्यंतची सर्वोच्च पातळी आहे. त्याचवेळी ९९.९ टक्के शुद्ध सोन्याचा भाव देखील वाढला आहे. आज त्याची किमत मागील दिवसाच्या ९०,२०० रुपयांच्या तुलनेत ९६,४५० रुपयांवर बंद झाली.
सोन्यासोबतच चांदीच्या किमतीही वाढल्या आहेत. चांदीच्या किमती २३०० रुपयांनी वाढून ९५,५०० रुपये प्रति किलो झाल्या. त्यापूर्वी ती ९३,२०० रुपयांवर बंद झाली होती. हे जागतिक बाजारात सोन्याच्या मागणीत वाढ दर्शवते. गुरुवारी महावीर जयंतीनिमित्त देशांतर्गत सराफा बाजार बंद होता. तर, एमसीएक्सवरील वायदा बाजारात जून डिलिव्हरीसाठी सोन्याचे दर १,७०३ रुपयांनी वाढून ९३,७३६ रुपये प्रति १० ग्रॅम या नवीन उच्चांकावर पोहोचले.
एलकेपी सिक्युरिटीजचे व्हीपी रिसर्च अॅनालिस्ट जतीन त्रिवेदी यांनी या संदर्भात टीओआयला सांगितले की, वाढती भू-राजकीय अनिश्चितता आणि अमेरिका आणि चीनमधील वाढत्या टॅरिफ वॉरमुळे रुपया मजबूत होत असूनही सोन्याच्या किमती वाढत आहेत. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस $३,२३७.३९ वर पोहोचला. आशियाई बाजारात सोन्याच्या किमतीत चांगली वाढ झाली. व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यात गुंतवणूक करत आहेत.