Gold-Silver Price Today | मकर संक्रातीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात उलथापालथ; आजचा 10 ग्रॅमचा भाव काय? जाणून घ्या
पुणे : Gold-Silver Price Today | सोनं-चांदीच्या दरांनी मागील काही दिवसांपासून जोरदार उसळी घेतली होती. आठवड्याची सुरुवातही या दरांनी सुस्साट केली होती. अमेरिका-व्हेनेझुएला तणाव असो किंवा अमेरिकेचा सीरियावर झालेला हल्ला, या साऱ्या घडामोडींचा परिणाम थेट जागतिक बाजारावर होताना दिसत आहे. त्याचा प्रभाव सोनं आणि चांदीच्या किमतींवरही स्पष्टपणे जाणवत आहे. मात्र, मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी म्हणजेच १३ जानेवारी २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत लक्षणीय घट झाली असून, गुंतवणूकदारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
कालच देशांतर्गत, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीने नवे उच्चांक गाठले होते. मात्र आज कॉमेक्सवर सोनं प्रति औंस ४,६०३.७० डॉलरवर घसरलं, तर चांदी प्रति औंस ८४.१०५ डॉलरवर आली. देशांतर्गत बाजारातही याचा परिणाम दिसून आला. मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम १,४१,७७० रुपये इतका नोंदवण्यात आला, तर चांदीचा भाव प्रति किलो २,६८,९१५ रुपये झाला.
आज दरात घट झाली असली, तरी सोनं आणि चांदी अजूनही त्यांच्या विक्रमी उच्चांकाच्या आसपासच आहेत. भारतात २४ कॅरेट सोन्याचा दर आज प्रति दहा ग्रॅम १,४२,१६० रुपये झाला आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम १,३०,३१० रुपये असून १८ कॅरेट सोन्याचा दर १,०६,६२० रुपये आहे. चांदीचा भावही प्रति किलो २,७०,१०० रुपयांवर पोहोचला आहे.
उद्या मकरसंक्रांत असून, आज सोनं-चांदीचे दर किंचित घटले असले, तरी ते अजूनही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहेत. वर्षाच्या पहिल्या सणाला सोनं खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही परिस्थिती काहीशी निराशाजनक ठरणारी आहे. मात्र, गुंतवणूकदारांसाठी ही घसरण महत्त्वाची मानली जात आहे.
