Gold-Silver Price Today | सोनं-चांदीचे दर गगनाला भिडले; खरेदी सामान्यांच्या आवाक्याबाहेर,आजचा भाव काय?

Gold

मुंबई/नवी दिल्ली :  Gold-Silver Price Today | सोनं आणि चांदीच्या दरांनी नवे उच्चांक गाठल्याने सामान्य ग्राहकांसाठी दागिने खरेदी करणे अधिकच कठीण झाले आहे. जागतिक बाजारातील अनिश्चितता, डॉलरमधील चढउतार आणि सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढलेला कल यामुळे मौल्यवान धातूंच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्या-चांदीच्या भावांनी ऐतिहासिक पातळी गाठली आहे.

एमसीएक्सवर सोन्याचा दर विक्रमी स्तरावर पोहोचला असून प्रत्यक्ष बाजारात कर, जीएसटी आणि मेकिंग चार्जेस जोडल्यास तो सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर जात आहे. त्याचप्रमाणे चांदीच्या दरातही झपाट्याने वाढ झाली असून, चांदीने प्रति किलो नवे उच्चांक गाठले आहेत. या दरवाढीचा थेट परिणाम मुंबई, दिल्लीसारख्या मोठ्या शहरांतील सराफा बाजारावर दिसून येत आहे.

29 जानेवारीच्या सकाळी सोन्याच्या किमतीत प्रचंड उसळी पाहायला मिळाली असून, दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,75,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. जागतिक बाजारपेठेत डॉलर कमकुवत झाल्याचा थेट परिणाम सोन्याच्या दरवाढीवर झाला आहे. अमेरिकन डॉलर गेल्या 4 वर्षांतील सर्वात खालच्या पातळीवर आला आहे.

सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली असून, आज चांदी चार लाख रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. औद्योगिक मागणी वाढल्याने चांदीला मोठा फायदा मिळत आहे.

उच्च दरांमुळे सध्या बाजारात दागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणावर घटली आहे. अनेक ग्राहकांनी खरेदी पुढे ढकलली असून, काहीजण केवळ गरज म्हणूनच मर्यादित खरेदी करत आहेत. सराफा व्यापाऱ्यांच्या मते, विशेषतः लग्नसराई आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ ग्राहकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. चांदीच्या वाढत्या दरांचा फटका छोटे व्यापारी आणि उद्योगांनाही बसत असल्याचे चित्र आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदी सुरक्षित गुंतवणूक मानली जात असल्याने गुंतवणूकदारांचा ओढा या धातूंकडे वाढत आहे. याचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारात दिसून येत असून, पुढील काळातही दरांमध्ये चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ग्राहक आणि गुंतवणूकदार दोघांनाही सावध पवित्रा घेण्याचा सल्ला दिला जात आहे.