Gram Panchayat | राज्यातील ग्रामपंचायती शुक्रवारी बंद राहणार; अखिल भारतीय सरपंच परिषदेचा इशारा
मुंबई : Gram Panchayat | राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना २० फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयात कामासाठी जाण्यापूर्वी विचार करावा लागणार आहे. कारण राज्यभरातील सर्व ग्रामपंचायती एक दिवसासाठी बंद ठेवण्याचा निर्णय अखिल भारतीय सरपंच परिषदेकडून घेण्यात आला आहे. शासनाने प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत हा राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारांच्या मुद्द्यावरून संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
राज्यातील सुमारे १६ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपल्यानंतर त्या ठिकाणी शासकीय प्रशासक नेमण्यात आले आहेत. मात्र एका अधिकाऱ्याकडे अनेक गावांचा कारभार सोपवला जात असल्याने स्थानिक पातळीवरील कामे वेळेवर होत नाहीत आणि निर्णय प्रक्रियेत विलंब होत असल्याची तक्रार सरपंचांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे गावांचा कारभार लोकनियुक्त प्रतिनिधींनाच द्यावा आणि विद्यमान सरपंचांनाच प्रशासकीय अधिकार द्यावेत, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. इतर काही राज्यांत अशी पद्धत लागू असल्याचे सांगत महाराष्ट्रातही त्यासाठी कायदेशीर तरतूद करण्याची मागणी सरपंच परिषदेने केली आहे.
या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी सविस्तर माहिती दिली.
याशिवाय विविध विकास योजनांची थकीत देयकेही मोठ्या प्रमाणात बाकी असल्याचा मुद्दा आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरला आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत रस्ते, विहिरी, गोठे तसेच स्वच्छता मोहिमांशी संबंधित कामांचे पैसे तातडीने द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. सरपंच-उपसरपंचांचे वाढीव मानधन, मतदानाचा अधिकार, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रश्न, विमा व निवृत्तीवेतन योजना यांसारख्या मागण्यांचाही यात समावेश आहे.
या सर्व मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. परिणामी, एक दिवसाचा हा बंद ग्रामीण भागातील दैनंदिन प्रशासकीय कामकाजावर परिणाम करणारा ठरणार असून नागरिकांना दाखले, प्रमाणपत्रे किंवा अन्य कामांसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
