Hadapsar Assembly Election 2024 | मांजरी-साडेसतरा नळी परिसरात प्रशांत जगताप यांच्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे: Hadapsar Assembly Election 2024 | हडपसर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत सुदाम जगताप (Prashant Sudam Jagtap) यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. मतदारसंघातील गल्लोगल्ली जात नागरिकांच्या गाठीभेटी घेत मतदानरूपी आशीर्वाद द्यावेत, असे साकडे मतदारराजाला घातले जात आहे. गुरुवारी जगताप यांनी मांजरी, साडेसतरा नळी, अमानोरा पार्क परिसरात पदयात्रा करून नागरिकांशी संवाद साधला.
मांजरी बुद्रुकपासून सुरु झालेली ही पदयात्रा के. के. घुले विद्यालय, कुंजीरवस्ती, भापकर मळा, मोरेवस्ती, कुंभारकर वस्ती, दिपकनगर, गोपाळपट्टी, महादेवनागर, पंधरा नंबर, साडेसतरा नळी, अमानोरा चौकात संपली. नागरिकांनी जगताप यांचे स्वागत, औक्षण करीत विजयासाठी आशीर्वाद दिला. ग्रामपंचायत परिसरात स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. मांजरीतील शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत जगताप यांनी आशीर्वाद घेतले. वाटेत येणाऱ्या प्रत्येक देवतांचे दर्शन घेत, महापुरुषांना अभिवादन करीत ही पदयात्रा पार पडली.
‘राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय असो’, ‘महाविकास आघाडीचा विजय असो’, ‘प्रशांतदादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी’ अशा जयघोषांनी परिसरात चैतन्य पसरले होते. महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी झाले होते. पदयात्रेदरम्यान जगताप यांनी हवेली पंचायत समितीचे माजी सभापती अशोकअण्णा मोरे, कात्रज दूध डेअरी संघटनेचे चेअरमन गोपाळअण्णा म्हस्के, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव केदारी, नगरसेविका भावनाताई केदारी, युवानेते साहिल केदारी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन संवाद साधला.
क्रांतिवीर लहुजी सेना महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने प्रशांत जगताप यांना विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर पाठिंबा देण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष जितेंद्रभाऊ भोसले व अन्य पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. गोडबोले वस्तीतील अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित समस्या सोडवू, तसेच यापुढील काळात समाजातील प्रत्येक घटकाच्या हितासाठी सदैव प्रयत्नशील राहील, असा शब्द जगताप यांनी दिला.
“मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय असून, हडपसर विधानसभा मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी भामा आसखेडच्या धर्तीवर मुळशी धरणातून ३ टीएमसी पाणी आणणार आहे. शिवसृष्टीप्रमाणे कात्रज घाट परिसरात शिवप्रतापगाथा प्रकल्प उभारणार आहे. तसेच ५०० स्क्वेअर फुटापर्यंतची घरे करमुक्त करणार, मतदारसंघातील व शहरातील गुंठेवारीअंतर्गत घरे नियमित करणार, मतदारसंघात अंतर्गत भागांत शटल बस सेवा सुरू करणार, मतदारसंघातील रस्ते विकासासाठी घोरपडी ते साडेसतरा नळी ते फुरसुंगी येथील जुना बेबी कॅनल बुजवून अंतर्गत रस्ता तयार करणार, हडपसरसह मांजरी व कोंढवा खुर्द येथे भव्य क्रीडा स्टेडियम, स्टार्टअप उद्योग उभारण्यासाठी प्रयत्नशील असून, हडपसरला गुन्हेगारी व ड्रगमुक्त करण्यासाठी पोलीस स्टेशन, चौक्यांची संख्या वाढवण्यासह सीसीटीव्हीचे जाळे विस्तारण्यावर भर दिला जाणार आहे,” असे प्रशांत जगताप यांनी सांगितले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा