Hadapsar Pune Crime News | घरावर संकट येणार असल्याचे सांगून मंत्रून देतो, असे सांगून साडेतीन लाखांचे दागिने घेऊन भोंदू बाबा पसार; हडपसर पोलिसांनी काही तासात केली भोंदू बाबाला अटक

Hadapsar Police Station

पुणे : Hadapsar Pune Crime News | त्याच्या सांगण्यावरुन पतीचे दारुचे व्यसन सुटल्याने त्यांच्यावर महिलेचा विश्वास बसला होता. या विश्वासाचा गैरफायदा घेऊन त्याने घरावर संकट येणार आहे, असे सांगून मंगळसुत्र, दागिने, मुलीची चैन घेऊन या. या वस्तू मंतरुन देतो, म्हणजे तुमच्यावरील संकट टळेल, असे सांगितले. महिलेला हडपसर भाजी मंडईजवळ बोलावले. नजर चुकवून ३ लाख ४० हजार रुपयांचे दागिने घेऊन हा बाबा म्हणविणारा पसार झाला. हडपसर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने या भोंदू बाबाला अटक केली आहे. (Arrest In Cheating Case)

निलकंठ सूर्यवंशी (वय ३५, रा. कनेरसर, ता. खेड, सध्या रा. आळेफाटा, ता. जुन्नर) असे या भोंदू बाबाचे नाव आहे. याबाबत फुरसुंगी येथील एका ४४ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार हडपसर येथील भाजी मंडईजवळील मानकार डोसा शेजारील रसवंतीगृहाजवळ २७ मार्च रोजी दुपारी दीड वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारण दोन वर्षांपूर्वी कनेरसर येथे फिर्यादी आपल्या पतीला घेऊन गेल्या होत्या. यमाई देवी मंदिराजवळ ते निलकंठ सूर्यवंशी यांना भेटले. त्यांच्या सांगण्यावरुन फिर्यादींच्या पतीने काही दिवस दारु पिणे सोडून दिले होते. त्यामुळे या महिलेचा त्याच्यावर विश्वास बसला. हा बाबा महिने दोन महिन्यातून कॉल करुन कौटुंबिक समस्यामध्ये मार्गदर्शन करीत असे. त्याबदल्यात या महिला कधी कधी पाचशे – हजार रुपये दक्षिणा म्हणून पाठवत असत.

या महिलेला २५ मार्च रोजी निलकंठ सूर्यवंशी यांचा फोन आला. त्याने सांगितले की, तुमच्या घरावर संकट आहे. त्यावर त्यांनी त्यांना काय उपाय आहे, असे विचारले. त्याने मी येतो मग बोलू असे सांगितले. त्यानंतर २७ मार्च रोजी त्याचा फोन आला, तुम्ही तुमचे मंगळसुत्र, दागिने व मुलीचे चैन घेऊन या. मी या वस्तू मंतरुन देतो, म्हणजे तुमच्यावरील संकट टळेल. त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसल्याने त्या दागिने घेऊन दुपारी दीड वाजता हडपसर भाजी मंडईजवळ आला. त्यांची निलकंठ सूर्यवंशी याच्याशी भेट झाली. त्यांनी मानकर डोसाजवळील रसवंतीगृहात उसाचा रस पिला. त्यानंतर त्याने दागिने मागितले. त्यांनी दागिने असलेली प्लास्टिकची पिशवी त्यांच्या हातात दिली. तो पिशवीत हात घालून काहीतरी पुटपटत होता. त्यानंतर त्याने या महिलेला लिंबु दिला. व पुढे जाण्यास सांगितले. थोडे चालल्यानंतर लिंबु खाली टाकून मी दागिने देईन. ते तुम्ही घाला. मी तुमच्या मागे येतो, असे सांगितले. त्याच्या सांगण्याप्रमाणे त्या थोडे पुढे गेल्या. लिंबु खाली टाकला. दागिने घेण्याकरीता मागे वळल्या असता त्यांना सूर्यवंशी तेथे दिसला नाही. त्यांनी आजू बाजूला शोध घेतला तरी तो दिसला नाही. तो सोन्याचा नेकलेस, लक्ष्मीहार, मंगळसुत्र, सोन्याची चैन असा ६८ ग्रॅम वजनाचे ३ लाख ४० हजार रुपयांचे दागिने घेऊन पसार झाला.

हडपसर पोलिसांकडे त्यांनी फिर्याद दिल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक हसन मुलानी व त्यांच्या सहकार्‍यांनी तांत्रिक विश्लेषण करुन निलकंठ सूर्यवंशी यांचा माग काढून त्याला अटक केली आहे.

You may have missed