Hadapsar Pune Crime News | एकटया राहणार्या ज्येष्ठ नागरिकाला घातलं व्यसनाच्या आहारी, 24 लाखांची फसवणूक; सुरक्षारक्षकच निघाला गुन्हेगार, हडपसर पोलिसांची कामगिरी

पुणे : Hadapsar Pune Crime News | एकट्या राहणार्या ज्येष्ठ नागरिकाला व्यसनाच्या आहारी नेऊन त्याच्या बँक खात्याचा अॅक्सेस घेऊन वेगवेगळ्या नातेवाईकांच्या नावावर पैसे ट्रान्सफर करुन २४ लाख ४८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आणण्यात हडपसर पोलिसांना यश आले आहे. या ज्येष्ठ नागरिकाच्या सोसायटीचा सुरक्षा रक्षक व दैनंदिन गरजेच्या कामामध्ये मदत करणार्यानेच मेव्हण्याच्या मदतीने हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे. (Arrest In Cheating Case)
मोहम्मद हनीफ मोहम्मद अफसर (वय ५२, सध्या रा. म्हसोबा मंदिराचे पाठीमागे, काळेपडळ, हडपसर, मुळ रा. पातूर, ता. पातूर, जि. अकोला) आणि इफ्तीकार रहिमखान पठाण (वय ३१, रा. रेहान पार्क, गौतमनगर, गोवंडी, मुंबई) अशी दोघा मेव्हण्यांची नावे आहेत. बंगलुरु येथे राहणार्या मुलाने आपले वडिल अशोक शंकर झरेकर (वय ६४, रा. मगरपट्टा सिटी रोड, हडपसर) यांच्या बँक खात्यातून अॅक्सेस घेऊन वेगवेगळ्या लोकांच्या नावावर २४ लाख ४८ हजार रुपये ट्रान्सफर करुन फसवणूक केल्याची तक्रार दिली होती. या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांनी माहिती मिळाली की, अशोक झरेकर हे एकटे रहात असून त्यांना दैनंदिन गरजेच्या कामामध्ये तेथील सुरक्षा रक्षक हनीफ हा मदत करत होता. परंतु, तो काम सोडून निघून गेला आहे. बँक खात्यातून स्टेटमेंट मागविल्यावर ही रक्कम इफ्तीकार खान व नूरजहाँ यांच्या बँक खात्यावर ट्रान्सफर झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या तांत्रिक तपासात हनीफ आणि इफ्तीकार खान हे एकमेकांच्या संपर्कात असल्याचे दिसून आले. पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, चंद्रकांत रेजितवाड, अमोल दणके, गायत्री पवार यांचे पथक गोवंडीला जाऊन इफ्तिकार पठाण याला ताब्यात घेऊन आले. त्याच्याकडून माहिती घेऊन पोलिसांनी हनीफ याला पकडले.
हनीफ आणि इफ्तिकार पठाण हे एकमेकांचे मेव्हणे असल्याचे त्यांनी सांगितले. हनीफ हा सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असताना त्याला अशोक झरेकर हे वेगवेगळी कामे सांगत होते. झरेकर एकटे रहात असल्याबाबत त्याने इफ्तिकार याला सांगितले. दोघांनी झरेकर यांची ओळख वाढवून त्यांना व्यसनाच्या आहारी नेले. वेळोवेळी एकत्र बसून त्यांच्या मोबाईलचा व बँकिंग अॅक्सेस घेऊन त्यांच्या बँक खात्यावरील रक्कम आरोपींच्या स्वत:चे व आपल्या नातेवाईकांच्या बँक खात्यावर परस्पर वळवली.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, अविनाश गोसावी, संदीप राठोड, तेजस पांडे, गायत्री पवार, चंद्रकांत रेजितवाड, अमोल दणके, कुंडलिक केसकर यांनी केली आहे.