Harshwardhan Sapkal On Narhari Zirwal | मंत्री नरहरी झिरवाळ यांचा तो व्हिडिओ नैतिक अध:पतन; हर्षवर्धन सपकाळ यांचा राज्य सरकारवर घणाघाती हल्ला
मुंबई : Harshwardhan Sapkal On Narhari Zirwal | राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते आणि राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून, त्यांनी राज्य सरकार आणि मंत्री झिरवाळ यांच्यावर बोचरी टीका केली आहे. हा प्रकार म्हणजे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला लागलेला कलंक असून, हे राजकारणाचे पूर्णपणे ‘नैतिक अध:पतन’ असल्याचे सपकाळ यांनी म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर वेगाने प्रसारित होत आहे. या व्हिडिओमध्ये ते एका ट्रान्सवुमनसोबत (पवन यादव) आक्षेपार्ह स्थितीत असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे, हा व्हिडिओ झिरवाळ यांच्या शासकीय निवासस्थानी चित्रित झाल्याची चर्चा असल्याने प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. पवन यादवच्या भावानेच हा व्हिडिओ समोर आणल्याचे बोलले जात असून, यामुळे सत्ताधारी महायुती सरकारची मोठी कोंडी झाली आहे.
या प्रकरणावर भाष्य करताना हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले की, “ज्या मंत्र्यांवर राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाची जबाबदारी आहे, त्यांचे असे वर्तन अत्यंत संतापजनक आहे. जनतेचा विश्वास आणि करदात्यांच्या पैशावर चालणाऱ्या शासकीय निवासस्थानाचा वापर अशा कृत्यांसाठी होणे, हे महाराष्ट्राच्या परंपरेला साजेसे नाही.” सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे की, नैतिकतेच्या आधारावर नरहरी झिरवाळ यांची मंत्रीपदावरून तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी. “जर सरकारने कारवाई केली नाही, तर हे सरकार अशा कृत्यांचे समर्थन करत आहे, असेच जनतेला वाटेल,” असा इशाराही त्यांनी दिला.
दुसरीकडे, मंत्री नरहरी झिरवाळ यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हा व्हिडिओ पूर्णपणे बनावट (डॉक्टर्ड) असून, आपली राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी आणि आपल्याला ब्लॅकमेल करण्यासाठी हा कट रचण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. “मी त्या व्यक्तीला गेल्या काही वर्षांपासून ओळखतो, परंतु व्हिडिओमध्ये जे चित्रित केले गेले आहे, तसा कोणताही प्रकार घडलेला नाही. तांत्रिक प्रक्रियेचा वापर करून मला बदनाम केले जात आहे,” असे स्पष्टीकरण झिरवाळ यांनी दिले आहे.
