Holi Special Buses | शिमग्यासाठी कोकणाकडे धावणार लालपरी! मुंबईहून जादा एसटी फेऱ्या, प्रवाशांना मोठा दिलासा

Special ST Buses For Holi | Special ST buses will depart from Mumbai to Konkan for Holi

मुंबई : Holi Special Buses | होळी-शिमगोत्सव जवळ आला की मुंबईतील चाकरमान्यांची पावले आपोआप कोकणाकडे वळतात. गावाकडच्या सणासाठी होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यंदा मोठी तयारी केली असून, मुंबई-कोकण मार्गावर जादा एसटी बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तिकीटासाठी होणारी धावपळ आणि खाजगी वाहनांवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

मुंबई महानगर परिसरातील मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला-नेहरू नगर, सायन, ठाणे, बोरीवली, नालासोपारा आणि विठ्ठलवाडी या प्रमुख आगारांतून कोकणातील खेड, दापोली, गुहागर, चिपळूण, महाड, लांजा, देवरुख आदी भागांसाठी विशेष जादा फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. २७ आणि २८ फेब्रुवारीपासून या बसेस सुरू होणार असून, दिवसभरासोबतच रात्रीच्या वेळेतही प्रवाशांसाठी सोयीस्कर सेवा ठेवण्यात आली आहे. त्यामुळे कामानंतर निघणाऱ्या प्रवाशांनाही थेट गावाकडे जाणे शक्य होणार आहे.

मुंबई सेंट्रल आगारातून रात्री उशिरापर्यंत कासे, खेड, गुहागर आणि दापोलीकडे बसेस सोडल्या जातील. परळ येथून दापोली-देवरुख-खेड मार्गावर सेवा असेल, तर कुर्ला आणि सायन येथूनही गुहागर, खेड आणि दापोलीसाठी विशेष गाड्या उपलब्ध राहतील. ठाणे सीबीएस येथून रात्री ९ ते १० या वेळेत महाड, साखरपा, गुहागर व दापोलीकडे बसेस सुटतील. बोरीवली आणि विठ्ठलवाडी आगारांतून सकाळी तसेच रात्री दोन्ही सत्रात जादा फेऱ्या ठेवण्यात आल्या आहेत.

प्रवाशांसाठी सवलतीही कायम राहणार आहेत. ‘महिला सन्मान योजना’ अंतर्गत महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास करता येणार असून ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’नुसार ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे कुटुंबासह गावाकडे जाणे अधिक परवडणारे ठरणार आहे.

शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी मोठ्या प्रमाणात तिकीटांची कमतरता जाणवते. मात्र यंदा जादा फेऱ्यांमुळे प्रवाशांची गैरसोय टळेल, अशी अपेक्षा एसटी प्रशासनाने व्यक्त केली आहे. प्रवाशांनी गर्दी टाळण्यासाठी वेळापत्रक तपासून आगाऊ नियोजन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

You may have missed