IPS Krishna Prakash | 54 व्या वर्षीही फिटनेस अशी! IPS कृष्ण प्रकाश यांनी 1 मिनिटात 50 जोर मारत पोलिस दलाला दिली प्रेरणा

IPS Krishna Prakash | Fitness even at 54! IPS Krishna Prakash inspired the police force by doing 50 push-ups in 1 minute

अहिल्यानगर : IPS Krishna Prakash | अहिल्यानगर जिल्ह्याच्या वार्षिक तपासणी दौऱ्यावर आलेले अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADG) कृष्ण प्रकाश यांनी पुन्हा एकदा आपल्या फिटनेसची झलक दाखवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. श्रीरामपूर येथे पोलीस अधिकाऱ्यांसोबत संवाद आणि प्रशिक्षण कार्यक्रम सुरू असताना अचानक फिटनेसबाबत छोटंसं आव्हान रंगले आणि त्यातच ‘आयर्न मॅन’ म्हणून ओळख असलेल्या कृष्ण प्रकाश यांनी थेट मैदानात उतरून उपस्थितांना चकित केले.

५४ वर्षांच्या वयात त्यांनी अवघ्या एक मिनिट १० सेकंदात तब्बल ५० जोर मारत तरुण पोलिसांनाही मागे टाकले. कार्यक्रमाला उपस्थित असलेले अधिकारी-कर्मचारी काही क्षण थक्कच झाले. अनेक जणांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे कौतुक केले, तर काहींनी त्यांच्यासोबत प्रयत्नही करून पाहिले; मात्र वेग आणि स्टॅमिनामुळे कोणीच त्यांच्या जवळपास पोहोचू शकले नाही.

कडक शिस्त, धाडसी कारवाया आणि वेगळी कार्यशैली यासाठी ओळखले जाणारे कृष्ण प्रकाश यांना ‘आयर्न मॅन’ म्हणून ओळखले जाते. त्यांनी केवळ गुन्हेगारीविरोधातील कामगिरीनेच नव्हे तर फिटनेस संस्कृती रुजवूनही पोलीस दलात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. नियमित व्यायाम, धावणे, सायकलिंग आणि शारीरिक प्रशिक्षणाला ते नेहमीच प्राधान्य देतात. त्यांच्या नावाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्येही झाली असून अनेक तरुण अधिकारी त्यांना फिटनेस आयकॉन मानतात.

१९९८ बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले कृष्ण प्रकाश यांनी गडचिरोली, नांदेड ग्रामीण, मालेगाव, बुलडाणा, अमरावती ग्रामीण, अहमदनगर, पिंपरी-चिंचवड आदी ठिकाणी काम करताना कडक प्रशासन आणि लोकाभिमुख कामकाज यांची सांगड घातली. श्रीरामपूर दौऱ्यातील हा प्रसंग केवळ एक प्रात्यक्षिक नव्हता, तर ‘नेतृत्व म्हणजे आदेश देणे नव्हे, तर उदाहरण घालून देणे’ हा संदेश देणारा होता.

या घटनेनंतर पोलीस दलात फिटनेसबाबत नव्याने उत्साह निर्माण झाला असून, वरिष्ठ अधिकारी स्वतः मैदानात उतरले तरच खऱ्या अर्थाने प्रेरणा मिळते, अशी भावना अनेक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. कृष्ण प्रकाश यांच्या या कृतीने पुन्हा एकदा सिद्ध केले, वय हे फक्त आकडा असतो, इच्छाशक्तीच खरी ताकद असते.

You may have missed