Jaisingh Maharaj More Dead | संत तुकाराम महाराजांचे 10वे वंशज जयसिंग महाराज मोरे यांचे निधन

पुणे : Jaisingh Maharaj More Dead | संत तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज आणि वारकरी समाजाचे आधारस्तंभ जयसिंग महाराज विश्वनाथ मोरे इनामदार यांचे बुधवारी निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
जयसिंग महाराज हे संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे यांचे मोठे बंधू होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वारकरी समाजाच्या सेवेसाठी आणि संत तुकाराम तसेच, संत ज्ञानेश्वर यांच्या शिकवणींच्या प्रसारासाठी समर्पित केले. वार्षिक पालखी मिरवणुकीतील शेडगे दिंडी क्रमांक ३ चे ते प्रमुख होते. या दिंडीद्वारे त्यांनी वारकरी परंपरेचे जतन व प्रचार केला.
त्यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वारकरी समाजातील अनेक मान्यवर, विविध संस्थानांचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी आणि भाऊ असा परिवार आहे. राज्यभरातून जयसिंग महाराजांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.