Jalgaon Crime News | पत्नीला माहेरी पाठवलं, माझे पती फोन घेत नाहीत जरा बघता का? पत्नीचा शेजारच्यांना फोन; घरात डोकावलं अन् धक्काच बसला

जळगाव : Jalgaon Crime News | खासगी सावकारीतून पैशांसाठीचा तगादा आणि धमक्यांना कंटाळून ३५ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरात कुणीही नसताना दोरीने गळफास घेऊन तरुणानं आयुष्य संपवलं. मुकेश अर्जुन पाटील (वय -३५ वर्ष, रा. चंदूआण्णा नगर, जळगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
ही धक्कादायक घटना काल बुधवार (दि.२६) दुपारी १२ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात यावी, अशी मागणी मयत तरुणाच्या नातेवाईकांनी केली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अधिक माहितीनुसार, मुकेश पत्नी आणि दोन मुलांसह चंदूआण्णा नगर, जळगाव येथे वास्तव्याला होता. एम.जे. कॉलेज परिसरात तो आयएमपी कम्प्युटर इन्स्टिट्यूट चालवत होता. कोरोना काळात इन्स्टिट्यूट सुरु ठेवण्यासाठी मुकेशने मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतले होते. ओळखीच्या लवेश चव्हाण याच्याकडून त्याने १ लाख २० हजार रुपयाचे कर्ज घेतले होते. त्यापैकी ६५ हजार रुपये त्याने परतही केले होते.
मात्र, उर्वरित रक्कम व्याजासह २ लाख ९५ हजार रुपये होती. या रकमेच्या परतफेडीसाठी लवेश चव्हाण सतत तगादा लावत होता. घटनेच्या दोन दिवस आधीच मुकेशने पत्नीला माहेरी पाठवले होते. त्यामुळे मुकेश हा घरी एकटाच होता. बुधवार दि.२६ सकाळी ११ वाजता लवेश चव्हाण आणि त्याचे ४-५ साथीदार मुकेशच्या घरी आले. त्यांनी मुकेशला शिवीगाळ करत धमकावले आणि त्याची दुचाकी जबरदस्तीने हिसकावून नेली.
या प्रकारामुळे मुकेश मानसिक तणावात गेला आणि त्याने दुपारी १२ वाजता आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नीने वारंवार फोन केला, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने तिने शेजारी कळवले. शेजाऱ्यांनी खिडकीतून पाहिले असता, मुकेशने गळफास घेतल्याचे लक्षात आले . तातडीने पोलिसांना आणि कुटुंबीयांना घटनास्थळी बोलावण्यात आले. ‘जोपर्यत आरोपींवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही,’ असा पवित्रा कुटुंबीयांनी घेतला होता.