Jalna Crime News | सुनेने सासूची हत्या करून मृतदेह भरला गोणीत; साथीदाराच्या मदतीने दुचाकीवरून फरार ; शोधकार्यासाठी पोलिसांची दोन पथके रवाना

जालना : Jalna Crime News | शहरातील भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनी येथे सुनेने सासूची हत्या करून मृतदेह गोणीत भरून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार आज बुधवार (दि.२) उघडकीस आला आहे. सासूची हत्या करून संशयित सून पहाटे फरार झाली आहे.
अधिक माहितीनुसार, शहरातील प्रियदर्शनी कॉलनी येथे शिनगारे कुटुंब भाड्याने राहतात. सहा महिन्यापूर्वी आकाश संजय शिनगारे यांचा परभणी येथील प्रतीक्षा सोबत विवाह झाला होता. आकाश हा खासगी नोकरी निमित्त लातूर येथे राहतो. तर, प्रतीक्षा ही सासू सविता सोबत जालन्यात राहात होती. आज (दि. २) पहाटे सासू सविता हिचा भिंतीवर डोके आपटून सून प्रतीक्षा हिने खून केला. त्यानंतर मयत सविताचा मृतदेह गोणीत भरून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिला मृतदेह घेऊन जाता आले नाही.
दरम्यान, संशयित प्रतीक्षा शिनगारे ही पहाटे साडेपाच वाजता घरातून बाहेर पडताना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. प्रतीक्षा शिनगारे ही साथीदाराच्या मदतीने दुचाकीवरून फरार झाली असून तिला शोधण्यासाठी पोलिसांची दोन पथके रवाना झाली आहेत. या घटनेचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.