Jay Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत जय पवार यांचा समावेश; सुनेत्रा पवारांकडून मोठी जबाबदारी

Jay Pawar | Jay Pawar included in the national executive of NCP; Big responsibility from Sunetra Pawar

पुणे : Jay Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) सध्या मोठ्या संघटनात्मक फेरबदलांचे वारे वाहत असून, पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांची अधिकृतपणे नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी या संदर्भात पत्र प्रसिद्ध केले असून, या माध्यमातून जय पवार यांचा सक्रिय राजकारणातील प्रवेश आणि पक्षांतर्गत वाढते महत्त्व अधोरेखित झाले आहे.

अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर पक्षाची धुरा सुनेत्रा पवार यांनी सांभाळली आहे. त्यानंतर आता नव्या पिढीला संधी देण्याच्या उद्देशाने जय पवार यांच्याकडे ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, जाहीर करण्यात आलेल्या या नवीन कार्यकारिणीच्या पत्रात जय पवार यांच्या नावाचा समावेश आहे, तर अजित पवारांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार यांच्या नावाचा उल्लेख नसल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

जय पवार यांनी गेल्या काही काळापासून बारामती आणि परिसरात जनसंपर्क वाढविण्यावर भर दिला आहे. आगामी निवडणुका आणि पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरुणांना आकर्षित करण्यासाठी आणि पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी जय पवार यांची ही नियुक्ती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील पवारांच्या तिसऱ्या पिढीचा सक्रिय राजकारणातील वावर आता राष्ट्रीय स्तरावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब झाला आहे.

You may have missed