Katraj-Kondhwa Road News | कात्रज – कोंढवा रस्त्यासाठी पंधरा दिवसांत भूसंपादन पूर्ण करणार ! परिवर्तन कक्षाच्या माध्यमातून पुढील वर्षभरात दैनंदिन व्यवस्थापनात आमूलाग्र बदल घडवणार
अतिक्रमण, बेकायदा होर्डिंग्ज, ओव्हरहेड केबल बाबत कठोर निर्णय घेणार; महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती
पुणे : Katraj-Kondhwa Road News | कात्रज कोंढवा रस्त्याचे भूसंपादन पुढील १५ दिवसांत पूर्ण करण्यात येईल. तसेच खडी मशीन चौक ते उंड्री रस्ता देखील प्रादेशिक विकास आराखड्यानुसार विकसित करण्यात येईल. समाविष्ट गावातील किमान एक प्रमुख रस्त्याचे काम आणि १२ मिसिंग लिंकच्या कामासाठी आगामी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात येईल. तसेच पुणे ग्रँड टूर निमित्त तयार करण्यात आलेल्या रस्त्यांवर कुठल्याही पद्धतीची खोदाई करण्यात येणार नसल्याचे महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी स्पष्ट केले.
सर्व विभागाणी एकत्र समन्वय साधून शहरातील स्वच्छता, रस्ते, वाहतूक यासारखी दैनंदिन व्यवस्थापनाची कामे करून वर्षभरात शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आयुक्त नवल किशोर राम आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या संकल्पनेतून ‘ परिवर्तन कक्षाची ‘ स्थापना करण्यात आली. या कक्षातील सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची आज महापालिकेत बैठक झाली. या बैठकीनंतर राम आणि डूडी यांनी माहिती दिली.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले ,की ९ वर्षांनंतर महापालिका निवडणूक झाली. बरेच नवीन नगरसेवक आणि अधिकारी देखील सेवेत दाखल झाले आहेत. पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेच्या निमित्ताने पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका, जिल्हाधिकारी , पीडब्लूडी, पोलिस, पीएमआरडीए, बीएसएनएल, वीज मंडळ अशा सर्व विभागानी एकत्र येत विक्रमी वेळेत पुण्यासह जिल्ह्यातील ४५० किमी चे दर्जेदार रस्ते तयार केले. या रस्त्यांवर स्वच्छता व सुशोभिकरण देखील झाले. यातून सर्व विभागांनी समन्वय ठेवून काम केल्यास आहे त्या रिसोर्सेस मध्ये शहरातील विकास कामे आणि दैनंदिन सुविधांमध्ये मोठा बदल होऊ शकतो, हे लक्षात आले.
या पार्श्वभूमीवर पुढील वर्षभराचे लक्ष ठेवून शहरातील तसेच जिल्ह्यातील लगतच्या भागातील दैनंदिन सुविधा अत्यंत दर्जेदार करण्याचा प्रयत्न आहे.
आज बैठकीमध्ये प्रत्येक डिपार्टमेंट चे एक दुसऱ्याकडे काय काम आहे यावर चर्चा झाली. यापुढे सर्व विभागांची दर महिन्याला मीटिंग घेणार आहोत. पाटबंधारे ला पाण्याचा इश्यू आहे, बेबी कॅनल चा वापर नाही . तिथे कचरा टाकला जातो. आम्ही त्यावर सायकल ट्रॅक करू. बीएसएनएल ला देखील रस्त्याचे काम करण्यापूर्वी त्यांचे काम असेल तर करावे. ओव्हरहेड केबल बाबत आम्ही एक महिन्यात एस ओ पी करत आहोत.
शहरात दीड दोन हजार हजार फिडर पॉईंट व हजारो विजेचे खांब उभे आहेत. बरेच ठिकाणी अंडरग्राऊंड काम केले तरी खांब तिथेच जागेवर असतात. त्यामुळे रस्ता रुंदीकरण झाले तरी उपयोग होत नाही. ते खांब काढले पाहिजे. पुढील दोन महिन्यात असे खांब हटवण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्यात येतील.
भूसंपादनाचे विषय आहे. कात्रज कोंढवा रोड च्या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून १५ दिवसात जागेचा ताबा मिळणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी चांगली मदत केली आहे. २३ गावे पीएमआरडी कडे आहेत. येथील रस्ते आर पी मध्ये आहेत. ते रस्ते करणे, राडारोडा व उचलणे हे काम पी एम आर डी ए ने केले पाहिजे. पहिल्यांदा असा एकत्रित उपक्रम होत आहे.
रस्ते चांगले झाल्याने सायकल स्पर्धा झाली – जितेंद्र डूडी, जिल्हाधिकारी
सायकल स्पर्धा बाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. आपण नियमितपणे का रस्ते करू शकत नाही. सायकल मुळे रस्ते नाही झाले रस्त्यांमुळे सायकल स्पर्धा झाली. आपल्याकडे इंजिनिअर आहेत. ४५० किमी चे रस्ते दुरुस्त झाले, स्वच्छ झाले. आम्हाला केवळ कॉन्फिडन्स बिल्ड करून यंत्रणा चांगले काम कमी कालावधीत करू शकते हे दाखवायचे होते. आम्ही २०२६ पर्यंत आणखी रस्त्यांचे टार्गेट करत आहोत. पुण्याला ग्लोबल सिटी करत असताना त्यासाठी टाइम बाऊंड चांगल्या सेवा देण्याचं प्रयत्न आहे. दीड हजार किमी रस्त्याचे टार्गेट झाले आहे. यामध्ये सर्व विभागांनी सर्वतोपरी एकजुटीने काम केले. जे रस्ते करणार आहोत, त्याची यादी देणार आहोत. .
प्रदूषण वाढत आहे ते थांबवणे गरजेचे आहे. आम्ही सायकल स्पर्धेच्या वेळी बांधकामावर काही बंधन आणली, जुनी वहाने रस्त्यांवर येणार नाहीत यासाठी प्रयत्न झाले नाही. आम्ही स्पोर्ट्सचा वापर करून इन्फ्रास्ट्रक्टर स्ट्राँग करण्याचा प्रयत्न आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी संघटना आणि नागरिकांची मदत लागणार आहे.
अतिक्रमणाबाबत कठोर निर्णय घ्यावा लागणार – नवल किशोर राम
रस्ते रुंद करण्यासाठी अतिक्रमणावर कारवाई करणार. स्पेशल ड्राइव्ह घेणार आहोत. दैनंदिन प्रशासनाची ड्युटी प्रामाणिकपणे केली तरी शहरातील ५० टक्के प्रश्न सुटणार आहे. यावर्षी समाविष्ट प्रत्येक गावातील किमान एक मुख्य रस्त्याचे काम पूर्ण करणार. ३० पैकी १२ मिसिंग लिंक चे काम पूर्ण करण्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे.
