Katraj Pune Water Supply | कात्रज परिसरात पाणी पुरवठा विभागाचा आठवड्यातून एकदा परस्पर ‘क्लोजर’ ! पाणी पुरवठ्याच्या मनमानी कारभाराचा कात्रजकरांना फटका

कात्रज (पुणे ) : Katraj Pune Water Supply | उन्हाळ्यामध्ये पुणे महापालिकेने कात्रज करांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. कुठलेही नोटिफिकेशन न काढता कात्रज परिसरात मागील चार आठवड्यांपासून एक दिवस पाणी बंदचा परस्पर निर्णय घेतला आहे. यामुळे नागरिकांची अडचण होत असून पाण्यासाठी वणवण करावे लागत आहे.
मागील वर्षी मुबलक पाऊस झाल्याने खडकवासला धरण साखळीत पुरेसा पाणीसाठा आहे. पावसाळ्यासाठी अद्याप अडीच ते तीन महिने बाकी असताना पुणे शहराला पुरेल एवढे पाणी धरण साठ्यात आहे. परंतु पाणीपुरवठा विभागाने शहराच्या काही भागात परस्पर क्लोजर सुरू केले आहेत. प्रामुख्याने वडगाव येथील जल केंद्रातून सिंहगड रस्ता,कात्रज ,कोंढवा या परिसराला पाणीपुरवठा होतो. मात्र महापालिकेच्या या झोनमध्ये पाणी पुरवठा विभागाने मागील चार आठवड्यांपासून नागरिकांना कुठलीही जाहीर सूचना न देता परस्पर काही भागात आठवड्यातून एक वेळा पाणी बंद ठेवण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांना याची काहीच कल्पना नसल्याने आणि पुरेसा पाणीसाठा करून न ठेवल्याने अडचणीला सामोरे जावे लागत आहे. कात्रज गावठाण, सुखसागर नगर, कोंढवा ,राजस सोसायटी या परिसरात आठवड्यातला एक एक दिवस पाणी पुरवठा बंद राहत आहे. या संदर्भात पाणीपुरवठ्याच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता आठवड्यातून एक दिवस पाणी बंद चा निर्णय मागील चार आठवड्यांपासून घेण्यात येत आहे असे सांगितले यासंदर्भात नोटीस काढली का याबाबत विचारणा केली असता अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले.
मागील काही वर्षात कात्रज, सुखसागर नगर हा परिसर वेगाने विकसित झाला आहे .या ठिकाणी सुमारे एक लाख नागरिक राहतात यामध्ये मोठ्या सोसायटी यांचाही सहभाग आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाच्या वतीने जाणीवपूर्वक काही सोसायटीना पाणी देण्यासाठी ‘ चावी ‘ वर परस्पर खेळ सुरू करण्यात आला आहे का ? अशी शंका नागरिक उपस्थित करू लागले आहेत. तीन वर्षापासून महापालिकेची निवडणूक न झाल्याने लोकप्रतिनिधी नाहीत त्यामुळे देखील पाणीपुरवठा विभागाचा मनमानी कारभार सुरू असल्याचे टीका नागरिक करू लागले आहेत.