Kavita Navande | दीड लाख रुपयांची लाच घेताना जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदेसह सहकारी अटकेत

Np News (1)

परभणी : Kavita Navande | दीड लाख रुपयांची लाच घेताना जिल्हा क्रीडा अधिकारी असलेल्या महिलेस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तिच्या सहकाऱ्यासह अटक केली आहे. कविता नावंदे (Kavita Navande) या अधिकारी महिलेचे नाव आहे. या प्रकरणात नानकसिंग महासिंग बस्सी यासही अटक करण्यात आली आहे. एका क्रीडा स्पर्धेचे बील काढण्यासाठी आणि जलतरणिकेची मान्यता देण्यासाठी दीड लाखाची लाच स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली आहे. (Parbhani ACB Trap Case)

अधिक माहितीनुसार, २०२४ साली झालेल्या क्रीडा स्पर्धेतील आयोजनाचे ५ लाख रूपयांचे देयक तसेच जलतरणिका बांधकामाचे ९० लाख रूपयांचे देयक नावंदे यांच्या कार्यालयात प्रलंबित होते. त्यासाठी तक्रारदाराने क्रीडा अधिकारी बस्सी याची भेट घेतली असता ही बिले मंजुर करण्यासाठी नावंदे यांच्यासाठी २ लाख तर बस्सी याने स्वतःसाठी ५० हजार असे एकुण अडीच लाख रूपये मागितले. तक्रारदाराने १३ मार्च रोजी यातील १ लाख रूपयाची रक्कम नावंदे यांना बस्सी याच्या समक्ष दिली. उर्वरित दीड लाख रुपये देण्याची तक्रारदाराची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. (Parbhani Bribe Case)

या संदर्भात गुरुवारी (दि. २७) सापळा रचण्यात आल्यानंतर बस्सी यांनी स्वतःसाठी ५० हजार रूपये स्विकारून १ लाखाची लाचेची रक्कम नावंदे यांच्या दालनात नेली. या दोघांनाही लाचलुचत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍याने दीड लाख लाचेच्या रक्कमेसह कार्यालयातच ताब्यात घेतले. दरम्यान याप्रकरणी आरोपींची व त्यांच्या घराचीही झडती घेण्यात आली. नावंदे यांच्या घर झडतीत १ लाख ५ हजार रूपये आढळून आले. या दोन्ही आरोपींविरूध्द नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

क्रीडा अधिकारी कार्यालयातील एका कर्मचार्‍याच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसांनी कुटुंब निवृत्ती वेतनाची मागणी केलेली असताना नावंदे यांनी या संदर्भातील कार्यवाही करण्याकरिता पैशांची मागणी केली होती. यासंदर्भात पैसे मागितल्याची ऑडीओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरलही झाली होती. विशेष म्हणजे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी त्यामध्ये आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार राजेश विटेकर यांनी विधानसभेत या महिला अधिकार्‍यास बडतर्फ करण्याची मागणी नुकतीच केली होती.

You may have missed