Khadki Pune Crime News | खडकी येथील अॅम्युनेशन फॅक्टरीतून काडतुसे चोरुन नेणार्या कर्मचार्यास IB च्या मदतीने वेशांतर करुन रंगेहाथ पकडले; 22 जिवंत काडतुसे घेऊन जाताना केली अटक

पुणे : Khadki Pune Crime News | खडकी येथील अम्युनेशन फॅक्टरीमधून २२ जिवंत काडतुसे चोरुन बाहेर पडताना इंटेलिजन्स ब्युरो (आय बी) आणि खडकी पोलिसांच्या मदतीने अॅम्युनेशन फॅक्टरीच्या सुरक्षा पथकाने एका कर्मचार्याला पकडले. खडकी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
गणेश वसंतराव बोरुडे (वय ३९, रा. कल्पतरु सोसायटी, खराडी रोड, चंदननगर) असे या अॅम्युनेशन फॅक्टरीतील कर्मचार्याचे नाव आहे.
याबाबत फॅक्टरीतील कनिष्ठ अभियंता जयेंद्र कस्तुरी यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही कारवाई शनिवार सायंकाळी साडेपाच वाजता अॅम्युनेशन फॅक्टरीतच्या गेट नं. १२ जवळ करण्यात आली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे अॅम्युनेशन फॅक्टरीमध्ये कनिष्ठ कार्यकारी अभियंता म्हणून काम करतात. त्यांना शनिवारी वरिष्ठ अधिकारी यांनी बोलावून एक गोपनीय कारवाई करायची असल्याचे सांगितले. ते त्यांना अॅम्युनेशन फॅक्टरीच्या गेट नं. १२ येथे घेऊन गेले. तेथे इंटेलिजन्स ब्युरोचे (आय बी) आणि खडकी पोलीस ठाण्याचे अधिकारी उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, गणेश बोरुडे हा जिवंत काडतुसे चोरुन बाहेर घेऊन जात असल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्यावर कारवाई करायची आहे. त्यानुसार त्या तिघांनीही वेशांतर करुन गेट नं. १२ येथे जाऊन पाळत ठेवली. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गणेश बोरुडे हा आला. तो त्यांच्या दुचाकीजवळ गेल्यावर त्यांनी घेराव घालून त्याला जागीच पकडले. त्याच्या होंडा अॅक्टीव्हा दुचाकीची झडती घेतली असता त्यात एकूण २२ जिवंत काडतुसे मिळून आली. त्याबाबत पोलिसांनी त्याच्याकडे अधिकृत लायसन्स आहे का याची विचारणा करता त्याने लायसन्स नसल्याचे सांगितले.
अॅम्युनेशन फॅक्टरीमध्ये काम करीत असताना तेथून विना परवाना जिवंत काडतुसे चोरुन तो बाहेर आणून विकत असल्याचे आढळून आले. यापूर्वी त्याने आणखी किती वेळा अशी चोरी केली व ही काडतुसे कोणाला विकली, याचा तपास खडकी पोलीस करीत आहेत.