Kolhapur Crime News | जबाब घेणाऱ्या पोलिसाचे अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन, मोबाईल क्रमांक देत छातीलाही स्पर्श; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

कोल्हापूर : Kolhapur Crime News | रुग्णालयात जबाब घेण्यास गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने एका अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. मुलीशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन घाटगे असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिसाचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.
अधिक माहितीनुसार, शाहूपुरीतील एका तरूणीने हाता-पायाला कापून घेतले होते. त्यानंतर तिला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तरूणीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. तरूणीचा जबाब नोंदवण्यासाठी अतिदक्षता विभागात पोलीस चेतन घाटगे पोहोचला. त्याने रात्री ८:३० च्या दरम्यान तरूणीचा जबाब नोंदवून घेतला.
तरूणीचा जबाब नोंदवून झाल्यानंतर पोलिसाने तिला आपला मोबाईल क्रमांक दिला. “तू माझी मैत्रीण आहेस. घाबरू नकोस. काही अडचण आली तर, मला फोन कर”, असे सांगत त्याने मुलीच्या शरीराला ठिकठिकाणी स्पर्श केला. तसेच छातीलाही स्पर्श केला. या प्रकरणाची माहिती पीडित मुलीने आपल्या कुटुंबाला दिली.
त्यानंतर पीडित मुलीने थेट पोलीस नाईक चेतन घाटगे विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर संबंधित पोलिसाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.