Kunal Kamra | स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : Kunal Kamra | स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर विडंबनात्मक गाणे सादर केल्याप्रकरणी वादाला तोंड फुटले आहे. त्यानंतर आता कुणाल कामराविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
कुणाल कामराच्या वक्तव्यानंतर शिवसैनिकांनी खार भागात असलेल्या युनिकॉन्टिनेंटल स्टुडिओची (Unicontinental Studios) तोडफोड केली. याप्रकरणी शिवसेनेकडून (शिंदे गट) एमआयडीसी पोलिसांकडे कुणाल कामराविरोधात तक्रार केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
शिवसेना नेते मुरजी पटेल यांनी याप्रकरणी तक्रार केली आहे. तक्रारीनुसार, २३ मार्चला त्यांनी एका कार्यक्रमात असताना मला माझ्या मोबाईल फोनवर आमच्या पक्षाच्या एका कार्यकर्त्यामार्फत पाठवण्यात आलेली लिंक प्राप्त झाली. त्यात कुणाल कामरा याने कॉन्टीनेन्टल हॉटेल, रोड क्रमांक ०३, खार पश्चिम, मुंबई याठिकाणी केलेल्या एका स्टॅण्डअप कॉमेडी शोच्या कार्यक्रमाची व्हिडीओ क्लिप प्रसारित केली होती. ती पाहिली असता, त्यात कामरा स्टॅण्डअप कॉमेडी शोमध्ये त्याने शिवसेना व एकनाथ शिंदे यांची बदनामी केली. त्याने विडंबनात्मक गाणे गायले. त्यामुळे एकमेकांप्रतीच्या भावना कलुशित होवून दोन राजकीय पक्षांमध्ये व्देष भावना उत्पन्न होत आहेत, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. (Stand-up comedian Kunal Kamra)