Ladki Bahin Yojana | पुण्यातील 16 हजार लाडक्या बहिणींचे आधार क्रमांक जुळेनात, योजनेतील लाभार्थ्यांच्या पडताळणीत माहिती समोर

पुणे : Ladki Bahin Yojana | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू केली. निवडणुकीपूर्वी अंमलबजावणी सुरु करायची असल्यानं पहिल्यांदा अधिक महिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला. यामध्ये पडताळणी न करता अर्ज भरुन घेऊन लाभार्थींची संख्या वाढवण्यावर दिला गेला. आतापर्यंत जवळपास सहा हप्त्यांची रक्कम महिलांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.
दरम्यान आता पुन्हा एकदा राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर लाभार्थ्यांची पडताळणी सुरु झाली आहे. त्यामधून लाभार्थी संख्या कमी होत आहे. अशातच या योजनेसाठी सुरूवातीला अर्ज भरत असताना महिलांनी चुकीची माहिती दिल्याचे पडताळणीमध्ये आढळून येत आहे. अशातच पुण्यातील १६ हजार लाडक्या बहिणींचे आधार क्रमांक जुळत नसल्याची माहिती समोर आली आहे.
या योजनेबाबत पडताळणी करताना कोणत्या महिलांच्या घरी चारचाकी आहे, त्याबरोबरच ज्या महिलांनी योजनेसाठी अर्ज भरताना चुकीचे आधार क्रमांक दिले, त्यांचीही माहिती घेण्यात येत आहे. योजनेसाठी अर्ज केलेल्या बहिणींचा आधार क्रमांक आणि कागदपत्रे जुळत नाहीत, अशा १६ हजार बहिणींची माहिती घेऊन अद्ययावत करण्याचे काम सध्या प्रशासनाकडून करण्यात येत आहेत.
पुणे जिल्ह्यामध्ये २१ लाख ११ हजार ९९१ बहिणींनी योजनेसाठी अर्ज केले होते. योजनेच्या निकषानुसार अपात्र ठरत असलेल्या लाभार्थ्यांना अगोदर स्वतःहून लाभ सोडण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. मात्र, त्याला जास्त प्रमाणात प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता राज्यसरकार योजनेच्या निकषानुसार पडताळणी करीत आहे. लाभार्थ्यांच्या किंवा कुटुंबीयांच्या नावे चारचाकी वाहन आहे, अशा लाभार्थ्यांची यादी परिवहन विभागाकडून घेतल्याची माहिती आहे.