Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा शानदार शुभारंभ; बहिणींच्या आनंदसोहळ्यात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सहभागी

Ladki Bahin Yojana Pune

लाडक्या भावाकडून रक्षाबंधनाची ओवाळणी मिळाल्याने महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण; लाडक्या बहिणींच्या जीवनात सुखाचे-आनंदाचे क्षण यावे हीच या भावाची इच्छा-मुख्यमंत्री

पुणे : Ladki Bahin Yojana | महिलांच्या ढोल आणि लेझीम पथकाचे सादरीकरण, उत्सवाच्या वातावरणात सजलेला आणि महिला भगिनींनी फुललेला शिवछत्रपती क्रीडानगरीचा परिसर, महिलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी महिलांना दिलेल्या शुभेच्छा… अशा उत्साहपूर्ण वातावरणात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा पुणे येथे राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. महिलांच्या जीवनात सुखाचे, आनंदाचे दिवस यावे हीच भाऊ म्हणून प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये माहेरचा अहेर मिळणार आहे, अशा भावपूर्ण शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या

म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछपत्रपती क्रीडानगरी येथे झालेल्या या सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, महिला व बाल विकास मंत्री कु. आदिती तटकरे आदी उपस्थित होते.

आजचा दिवस लाडक्या बहिणींच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण आहे असे नमूद करून मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाखो बहिणी मिळाल्या याचा मनापासून आनंद आहे. त्यांचे प्रेम ही जीवनातील मोठी शिदोरी आहे. या योजनेसाठी पूर्ण वर्षाचे आर्थिक नियोजन करण्यात आले आहे. या दीड हजार रुपयांचे मोल गरजू बहिणींसाठी खूप आहे. त्यांना या रकमेतून कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासोबत आर्थिक उन्नती साधता येईल. आता मदतीसाठी कुणासमोर हात फैलावे लागणार नाही.

महिलांना योजनेचे अर्ज भरण्यासाठी ३१ ऑगस्ट पर्यंत मुदत आहे. अर्ज भरल्यानंतर त्यांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्याची एकत्रित रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल. काही महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडले गेल्यानंतर त्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल. प्रत्येक पात्र भगिनीला योजनेचा लाभ दिला जाईल. लाखो बहिणींच्या खात्यात दर महिन्याला निश्चित रक्कम जाईल याचे खूप समाधान आहे, अशा शब्दात श्री. शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

महिला भगिनींसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला. भावालाही मदत करण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली. सर्वांच्या जीवनात सुखाचे क्षण यावे यासाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. जनतेची सेवा हेच शासनाचे ध्येय असून प्रत्येक योजना यादृष्टीनेच गतीने राबविण्यात येत आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

महिला लखपती झालेल्या बघण्याची, त्यांना आत्मसन्मान मिळवून देण्याची शासनाची इच्छा असून महिलांच्या विकासाच्या योजना राबविण्यासाठी हात आखडता घेतला जाणार नाही, बहिणींच्या हितासाठी शासन आवश्यक ते सर्व प्रकारचे प्रयत्न करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

महिलांचा सन्मान करणारा महाराष्ट्र घडवून दाखवू – देवेंद्र फडणवीस

राज्याच्या अर्थव्यवस्थेत महिलांची भागीदारी असावी असा केंद्र आणि महाराष्ट्र शासनाचा प्रयत्न आहे. यामुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्थाही वेगाने वाढणार असून महिलांचा सन्मान करणारा महाराष्ट्र घडवून दाखवू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी मार्च २०२५ पर्यंतची तरतूद केली असून पुढेही दरवर्षी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल, असेही ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले, आजचा हा सावित्रींच्या लेकींचा कार्यक्रम आहे. पुणे ही समाजकारणाची आणि परिवर्तनाची भूमी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरूवात पुण्यापासून केली जात आहे. हे सरकार बहिणींना लाभ देणारे सरकार आहे. १ कोटी ३ लाख महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे कार्यक्रमापूर्वीच जमा झाले आहेत. ऑगस्टमध्ये ज्या महिलांच्या अर्जाची छाननी होईल, त्यांना जुलैपासूनच लाभ मिळेल. सप्टेंबरमध्ये ज्या महिलांच्या अर्जांची छाननी होईल, त्यांनाही जुलैपासूनच लाभ मिळेल. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि सचिव अनुपकुमार यादव यांच्या नेतृत्वात अतिशय गतीने योजनेचा लाभ देण्याचे काम झाले आहे.

विकसित भारत करणे हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे स्वप्न आहे. महिलांचा विकास झाला, तरच भारत विकसित होऊ शकतो असे प्रधानमंत्री कायम म्हणतात. त्यामुळेच केंद्र आणि राज्यात आम्ही स्त्रीकेंद्रित योजना सुरू केल्या. लखपती दिदी, लेक लाडकी, शिक्षण शुल्क माफी योजना आणि लाडकी बहीण योजना या दृष्टीकोनातूनच सुरू करण्यात आल्या गेल्या. राज्याच्या अर्थव्यवस्थेत महिलांची भागीदारी असावी, असा आमचा प्रयत्न आहे.

ही योजना म्हणजे आम्ही महिलांप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता आहे. ही रक्षाबंधनानिमित्त दिलेली ओवाळणी आहे. आईचं आणि बहिणीचं प्रेम जगातील कोणतीही संपत्ती विकत घेऊ शकत नाही. माझ्या माय माऊलीला पंधराशे रुपयांचे मोल समजते, असेही ते म्हणाले.

भाऊबीज सणानिमित्ताने भावांकडून बहिणीला ओवाळणी-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, राज्यातील महिलांना अधिक सक्षम, सबल करण्यासाठी त्यांना मान, सन्मान प्रतिष्ठा मिळवून देण्याकरीता अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेला माता-भागिनींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. आजपर्यंत १ कोटी ३ लाख रुपये माता-भागिनींच्या बँक खात्यात जुलै व ऑगस्ट महिन्याचे मिळून ३ हजार रुपये जमा करण्यात आले आहे.  या महिलांच्या चेहऱ्यावर आनंद, समाधान, हसू दिसून येत आहे. भाऊबीज सणानिमित्ताने ओवाळणी म्हणून भेट दिली आहे.

माता-भगिनी जीवन जगताना त्यांच्या आशा अपेक्षा असतात परंतु स्वतःचे हीत बाजूला ठेवून कुटुंबाच्या भल्याकरीता त्या काम करीत असतात. या योजनेच्या माध्यमातून त्यांच्या आशा- अपेक्षापूर्तीसाठी काम करण्यात येत आहे. यापुढेही या योजनेत सातत्य राहणार असून एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही, असे त्यांनी श्री. सांगितले.

राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुलींना मोफत व्यवसायिक शिक्षण अशा विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. राज्याच्या हिताकरीता बेरोजगारी कमी करण्यासाठी, सर्व सामान्य नागरिकांचे जीवन सुखकर करण्यासाठी, मेट्रोचे जाळे निर्माण करण्यासाठी केंद्र व राज्य शासन मिळून काम करीत असून नागरिकांनी विकासकामांना सहकार्य करावे, असे आवाहन श्री. पवार म्हणाले.

योजनेमुळे महिलांना दिलासा मिळेल-डॉ.नीलम गोऱ्हे

तीन दशकांच्या महिला धोरणाच्या इतिहासात या कार्यक्रमाच्या कार्यक्रमपत्रिकेत मान्यवरांच्या नावापुढे आईचे नाव लावल्याबद्दल समाधान व्यक्त करून विधान परिषद उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, महिलांची संख्या निम्मी असून दोन तृतीयांश तास त्या काम करतात. जगातील १ टक्के संपत्ती महिलांच्या नावावर आहे. अशा स्थितीत या योजनेमुळे महिलांना निश्चितपणे दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रबोधनाची परंपरा आणि महिला विकासाचा वारसा असलेल्या पुण्यात या योजनेचा समारंभ होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

योजनेद्वारे २ कोटींपेक्षा अधिक महिलांना लाभ देण्याचा प्रयत्न-कु. आदिती तटकरे

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंत्री कु.तटकरे यांनी केले. दोन दिवसांनी रक्षाबंधन साजरा होणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या तीन लाडक्या भावांनी आधीच ओवाळणी दिली. या योजनेला उदंड प्रतिसाद मिळाला. १ कोटी ३५ लक्ष महिला लाभासाठी पात्र ठरल्या, त्यापैकी १ कोटी ३ लक्ष महिलांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्यात आली आहे. प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामसेवक आदींनी यासाठी खूप परिश्रम केले. २ कोटींपेक्षा अधिक महिलांना लाभ देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक विजेत्या स्वप्नील कुसळेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते महिला बचत गटांना मार्गदर्शन करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘यशस्विनी प्लॅटफॉर्म’ पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात योजनेच्या धनादेशाचे आणि स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, खासदार मेधा कुलकर्णी, सुनील तटकरे, श्रीरंग बारणे, आमदार प्रा. राम शिंदे, उमा खापरे, योगेश टिळेकर, प्रसाद लाड, दिलीप मोहिते पाटील, माधुरी मिसाळ, भिमराव तापकीर, राहुल कुल, महेश लांडगे, सिद्धार्थ शिरोळे, अश्विनी जगताप, सुनील कांबळे, सुनील शेळके, महिला व बालविकास सचिव अनुपकुमार यादव, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, क्रीडा आयुक्त डॉ.राजेश देशमुख, पुणे मनपा आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले, महिला व बालविकास आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, एकात्मिक बालविकास योजना सेवा आयुक्त कैलास पगारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आदी उपस्थित होते.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Anjali Damania On Ajit Pawar | राज्याच्या राजकारणात आज मोठा गौप्यस्फोट! अंजली दमानिया म्हणाल्या – अजित पवारांकडे इतका पैसा येतो कुठून?

Maharashtra Assembly Election 2024 | आज विधानसभा निवडणूक झाल्यास कोण जिंकणार, महायुती की मविआ? ओपिनियन पोलची धक्कादायक आकडेवारी समोर

Prithviraj Chavan On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेच्या मुख्यमंत्री पदाबाबतच्या मागणीवर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘ती आमची प्राथमिकताच नाही!’

Kondhwa Pune Crime News | सहदेव महंत रामगिरी महाराजांविरोधात कोंढव्यात गुन्हा दाखल; दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

Bibvewadi Pune Crime News | हरवलेली मतीमंद मुलगी सीसीटीव्हीत कैद झाली आणि अपहरणाच्या शक्यतेने उडाली खळबळ,
रात्रभर शहर पोलिसांनी घेतला शोध

You may have missed