Lashkar-e-Bhima News | अमृता फडणवीस यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या अंजली भारतींवर गुन्हा दाखल करावा
लष्कर-ए-भीमा संघटनेचे संस्थापक सचिन धिवार यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी
पुणे: Lashkar-e-Bhima News | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी तथा सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांच्या संदर्भात सोशल मीडियावर अत्यंत घृणास्पद, हिंसाचारास प्रवृत्त करणारी व महिलांच्या सन्मानाला धक्का देणारी विधाने केल्याप्रकरणी अंजली भारती यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते व लष्कर-ए-भीमा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन शिवाजीराव धिवार यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचाकडे केली. या मागणीचे निवेदन स्वीकारत पोलीस आयुक्तांनी याची दखल घेतली असून, गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना दिले.
धिवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २७ जानेवारी रोजी युट्यूब, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित झालेल्या एका व्हिडिओमध्ये अंजली भारती यांनी बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याचा उल्लेख करत अमृता फडणवीस यांच्यासंदर्भात अत्यंत आक्षेपार्ह, स्त्रीद्वेषी आणि हिंसाचारास प्रोत्साहन देणारी विधाने केली. ही विधाने कोणत्याही प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षेत येत नसून ती थेट लैंगिक हिंसाचाराचे समर्थन व प्रोत्साहन देणारी असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यावेळी आंबेडकरी चळवळीतील अनेक कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या.
सचिन धिवार म्हणाले, “आंबेडकरी चळवळीच्या आडून अंजली भारती यांनी ही विधाने केली आहेत. मात्र, आंबेडकरी विचार महिलांचा सन्मान, प्रतिष्ठा व सुरक्षितता जपणारी आहेत. त्यामुळे भारती यांची विधाने महिलांच्या सन्मानाला ठेस पोहोचवणारी असून, समाजात द्वेष, भीती व अस्थिरता पसरवणारी आहेत. सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणावर ही विधाने प्रसारित झाल्याने अनेक महिला तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे या बेताल महिलेविरोधात गुन्हा दाखल करून तातडीने कठोर कारवाई करावी. अन्यथा ‘लष्कर-ए-भीमा’च्या महिला ब्रिगेडकडून भारती यांना धडा शिकवण्यात येईल.”
अंजली भारती यांच्या विधानांमुळे सार्वजनिक नैतिकता, सामाजिक शांतता आणि स्त्री-सन्मान यांचा भंग झाल्याचा दावा करत त्यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता, भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. संबंधित व्हिडिओचा दुवा तक्रारीसोबत जोडण्यात आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कठोर कायदेशीर कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात महिलांविरोधात व हिंसाचारास प्रवृत्त करणारी विधाने करणाऱ्यांना आळा बसेल, अशी मागणी सचिन धिवार यांनी केली आहे.
