Latur News | मुलाच्या अवयवदानाने 6 जणांना जीवदान; लातूर येथील आई-वडिलांचा मोठा निर्णय

Organ-Donation

लातूर : Latur News | लातूर येथील आई-वडिलांनी ब्रेन डेड झालेल्या आपल्या मुलाचे अवयवदान (Organ Donation) करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे 6 जणांना नवजीवन मिळाले. 19 मार्चला दुचाकी अपघातात लातूर शहरातील भावेश संतोष तिवारी (वय 20, रा. हमाल गल्ली लातूर) या तरुणाचा अपघात झाला होता. ब्रेन डेड झाल्याने त्यांचे अवयवदान हैदराबाद येथे करण्याचा निर्णय त्याच्या आई-वडिलांनी घेतला.

भावेषचे दोन्ही मूत्रपिंड, हृदय, दोन डोळे व लिव्हर याचे दान करण्यात आले. त्यातून 6 जणांना नवजीवन मिळाले . रंगपंचमीच्या दिवशी भावेश आपल्या आईसोबत औसा रस्त्यावरील वासनगाव येथील राधास्वामी सत्संग मंडळाच्या सत्संगात सहभागी होण्यासाठी निघाला होता. मात्र, समोरून येणाऱ्या दुचाकीची समोरासमोर धडक बसल्याने भावेश गंभीर जखमी झाला. त्याची आई अरुणा तिवारीही जखमी झाली. भावेशला एका खासगी रुग्णालयात नेले. पण त्याच्या मेंदूला मार लागल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया केली. तीन दिवसानंतर डॉक्टरांनी मुलगा भावेष ब्रेन डेड झाल्याचे सांगितल्यानंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

अवयवदान केल्यानंतर शुक्रवारी (ता. 28) सकाळी हैदराबाद येथून मृतदेह लातूरात दाखल झाला. भावेषच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्यूनंतर अवयवदान करून इतरांना जीवनदान मिळू शकते. त्यामळे अवयवदानाने कुटुंबीयांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श घालून दिला आहे.

You may have missed