Lionel Messi In India | फुटबॉलचा ‘GOAT’ मेस्सीच्या 70 फूट उंच पुतळ्याचे व्हर्च्युअल अनावरण
Lionel Messi In India | फुटबॉलचा महान खेळाडू लिओनेल मेस्सी तब्बल १४ वर्षांनंतर ‘GOAT इंडिया टूर’साठी भारतात दाखल झाला आहे. मेस्सीच्या आगमनामुळे कोलकात्यात चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला असून, नाच-गाणे आणि जल्लोषात त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. लेक टाऊन येथील श्री भूमी स्पोर्टिंग क्लबमध्ये मेस्सीचा तब्बल ७० फूट उंच भव्य पुतळा उभारण्यात आला असून, तो या दौऱ्याचे प्रमुख आकर्षण ठरला आहे.
फिफा विश्वचषक ट्रॉफी उंचावतानाचा मेस्सीचा ऐतिहासिक क्षण साकारण्यात आलेला हा पुतळा जगातील मेस्सीचा सर्वात मोठा पुतळा असल्याचा दावा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या पुतळ्याचे अनावरण मेस्सीने व्हर्च्युअल पद्धतीने केले. या अनावरण सोहळ्याला पश्चिम बंगालचे मंत्री तसेच श्री भूमी स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष सुजित बोस उपस्थित होते.
जरी पुतळ्याचे अनावरण लेक टाऊनमध्ये झाले असले, तरी मेस्सीचा मुख्य कार्यक्रम सॉल्ट लेक स्टेडियम येथे पार पडला. व्हर्च्युअल अनावरणानंतर मेस्सी थेट सॉल्ट लेक स्टेडियममध्ये चाहत्यांना भेटण्यासाठी हजर झाला. या भव्य कार्यक्रमाला बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि क्रिकेटपटू सौरव गांगुली यांसह विविध क्षेत्रांतील दिग्गजांची उपस्थिती लाभली.
या ‘GOAT इंडिया टूर’मध्ये मेस्सीसोबत त्याचे सहकारी खेळाडू लुईस सुआरेझ आणि रोड्रिगो डी पॉल हेही भारतात आले आहेत. या दौऱ्यामुळे कोलकात्यात सध्या उत्साह आणि फुटबॉलप्रेमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
