Loni Marathon 2026 | मुख्य प्रायोजक पुनीत बालन ग्रुप (पुणे) आणि ऑक्सीरीच असलेल्या लोणी मॅरेथॉन 2026 चे चौथे पर्व उत्साहात संपन्न; 21 किमी गटात आश्लेषा झोलेकर व निलेश यादव विजेते
लोणी : Loni Marathon 2026 पुणे ग्रामीणमधील सर्वात मोठ्या क्रीडा उपक्रमांपैकी एक असलेल्या लोणी मॅरेथॉन 2026 चे चौथे पर्व पुनीत बालन ग्रुप (पुणे) आणि माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात पार पडले. देशभरातून आलेल्या 3,500 हून अधिक धावपटूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. पुण्याच्या ‘पॉवरफुल अल्ट्रा रनर्स’चा विशेष सहभाग लक्षवेधी ठरला.
या मॅरेथॉनचे मुख्य प्रायोजक पुनीत बालन ग्रुप (पुणे) आणि ऑक्सीरीच होते. 3 किमी, 5 किमी, 10 किमी आणि 21 किमी अशा चार अंतरांच्या स्पर्धा पुरुष व महिला गटांत घेण्यात आल्या. प्रत्येक स्पर्धकास टी-शर्ट, चेस्ट नंबर (बिब) देण्यात आला, तर सर्व धावपटूंना मेडल देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धकांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण मार्गावर हायड्रेशन पॉइंट्स, डॉक्टरांसह अद्ययावत वैद्यकीय सुविधा आणि रूट पायलट सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. दिव्यांग स्पर्धकांचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला. पोलीस प्रशिक्षण केंद्र नानविज व खंडाळा येथील अनेक धावपटूंनीही सहभाग नोंदवला.
या प्रसंगी अवर पोलीस अधीक्षक व ‘आयर्न मॅन’ म्हणून प्रसिद्ध विष्णू ताम्हाणे, उपमुख्यमंत्री कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी डॉ. अमर भडांगे, क्रीडामंत्री कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी सुनील, तसेच दुबई व इटली येथे मॅरेथॉन पूर्ण केलेले ‘आयर्न मॅन’ डॉ. सागर गुजराती प्रमुख अतिथी व सहभागी म्हणून उपस्थित होते.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सुमारे 350 स्वयंसेवक व प्रतिनिधींनी उत्स्फूर्तपणे काम केले. यावेळी राष्ट्रपती पुरस्कार विजेते किसन गायकवाड, माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनीचे अध्यक्ष उदयसिंह वाळुंज, महसूल विभागातील सहसचिव डॉ. कैलास गायकवाड, प्रबोधिनीचे खजिनदार बाळासाहेब गायकवाड, पुनीत बालन ग्रुपचे सदस्य चेतन लोखंडे, संतोष पडवळ, प्रकाश वाळुंज, पांडुरंग वाळुंज, नवनीत सिनलकर, प्रदीप कोचर आदी मान्यवर उपस्थित होते.
या मॅरेथॉनमध्ये 7 ते 72 वयोगटातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. लक्ष्मीबाई रामभाऊ गायकवाड, हरिश्चंद्र थोरात आणि भामाबाई मारुती वाळुंज यांना विशेष लक्षवेधी पुरस्कार देण्यात आले. ऋतुजा इंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्पर्धेपूर्व आवश्यक स्ट्रेचिंग व वार्म-अप व्यायाम घेतले.
लोणी ग्रामपंचायत व ग्रामस्थ, विविध स्वयंसेवी, सहकारी व सामाजिक संस्था तसेच पारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे व त्यांच्या सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभले. सर्व सहभागींस ऑक्सीरीच पाणी व नाश्ता देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. मॅरेथॉनचे संपूर्ण व्यवस्थापन रेस डायरेक्टर राजेश वाळुंज यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. अविनाश वाळुंज आणि डॉ. मयूर लोखंडे यांनी केले.
