LPG Gas Shortage | राज्यात गॅस टंचाईची धग; काँग्रेस आक्रमक, विधिमंडळाचे कँटीनही पडले बंद
मुंबई : LPG Gas Shortage | राज्यात निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या मुद्द्यावरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून काँग्रेसने या प्रश्नावर सरकारला विधीमंडळात धारेवर धरले आहे. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस पुरवठा विस्कळीत झाला असून, त्याचे थेट परिणाम आता महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचले आहेत. या गंभीर टंचाईकडे लक्ष वेधताना काँग्रेसने सरकारकडे तातडीने स्पष्टीकरणाची मागणी केली आहे.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा उपस्थित करताना अत्यंत धक्कादायक माहिती समोर आणली. त्यांच्या दाव्यानुसार, राज्यात घरगुती गॅसचा साठा अत्यंत कमी झाला असून, अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांना सिलिंडरसाठी वणवण करावी लागत आहे. या टंचाईचा मोठा फटका हॉटेल उद्योगालाही बसला असून, मुंबईतील नरिमन पॉइंटसारख्या परिसरातील अनेक हॉटेल्सना गॅसअभावी टाळे लागले आहे. वडेट्टीवार यांनी सरकारला चपराक लगावताना सांगितले की, राज्याच्या विधीमंडळाचे कँटीनही गॅस उपलब्ध नसल्यामुळे बुधवारी बंद ठेवावे लागले, ही अत्यंत गंभीर बाब आहे. जर लोकप्रतिनिधींच्या जेवणाची सोय असलेल्या ठिकाणी ही अवस्था असेल, तर सामान्य जनतेचे काय हाल होत असतील, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सरकारने या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घरगुती गॅसच्या साठेबाजीला आळा घालण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार आता गॅस कंपन्यांनी व्यावसायिक वापरापेक्षा घरगुती वापराला प्राधान्य द्यावे, असे आदेश जारी करण्यात आले आहेत. तसेच, एका सिलिंडरनंतर दुसऱ्या सिलिंडरच्या बुकिंगचा कालावधी २१ दिवसांवरून २५ दिवस करण्यात आला आहे, जेणेकरून साठेबाजी रोखता येईल. मात्र, काँग्रेसने सरकारच्या या नियोजनावर तीव्र टीका करत ‘सरकार केवळ कागदी घोडे नाचवत असून प्रत्यक्ष जमिनीवर जनतेला सिलिंडर मिळत नाहीये’ असा आरोप केला आहे. या टंचाईमुळे आगामी काळात गॅसचा काळाबाजार वाढण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली असून, सरकारने तातडीने शुद्धीकरण कारखान्यांना उत्पादन वाढवण्याचे आदेश देऊन पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
