Maharashtra Assembly Election 2024 | ‘आता बँकेला ३०० कोटी …’, अजित पवार गटातील आमदाराचे मोठे विधान; म्हणाले – ” नाईलाजाने अजित पवारांसोबत गेलो…”
वर्धा : Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीची लगबग सुरु झाली आहे. पुढील दोन ते तीन महिन्यात निवडणुका पार पडतील अशी चर्चा आहे. नेत्यांच्या बैठका, दौरे सुरु झाले आहेत. तसेच नेत्यांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट (Ajit Pawar NCP) आणि राष्ट्रवादी शरद पवार गट (Sharad Pawar NCP) एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहे. दरम्यान विरोधी आमदार संपर्कात असल्याचीही वक्तव्ये केली जात आहे.
असे असतानाच आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार राजेंद्र शिंगणे (MLA Rajendra Shingne) यांनी मोठं विधान केलं आहे. “मी अजित पवार यांच्याबरोबर नाईलाजाने गेलो”, असं राजेंद्र शिंगणे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं. याचवेळी राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवारांचंही तोंडभरुन कौतुक करत आजही मी शरद पवारांना नेता मानतो, असंही म्हटलं आहे. त्यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
राजेंद्र शिंगणे म्हणाले, ” गेली अनेक वर्षे मी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. माझ्या राजकीय जडणघडणीमध्ये देखील शरद पवार यांचा मोठा मोलाचा वाटा असल्याचंही मी मान्य करतो. त्यामुळे मी आयुष्यभर निश्चितपणे त्यांचा ऋणी राहणार आहे.
मात्र, मध्यंतरीच्या काळात आमच्या जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे मी नाईलाजाने अजित पवार यांच्याबरोबर गेलो. त्यानंतर आज राज्य सरकारने जिल्हा सहकारी बँकेला ३०० कोटी रुपये दिले. परंतु निश्चितपणे शरद पवार माझ्यासाठी आदरणीय राहतील”, असं आमदार राजेंद्र शिंगणे यांनी म्हटलं आहे.
ते पुढे म्हणाले, ” मी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये सहभागी झालो असलो
तरी गेल्या दोन ते अडीच वर्षांत शरद पवार यांच्याबरोबरील संबंध तोडले असा काही भाग नाही.
आजही मी शरद पवार यांना नेता मानतो.
गेल्या दोन वर्षांत जाहीर भाषणात असेल किंवा वैयक्तिक बोलतानाही शरद पवार यांचं नाव मी राज्यातील मोठे नेते आणि लोकनेते असंच घेत आलो.
भविष्यात देखील शरद पवार यांचं नेतृत्व राज्याला आणि देशाला आश्वासकच राहणार आहे”, असंही राजेंद्र शिंगणे यांनी म्हटलं आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा