Maharashtra Politics News | मंगळवार पेठेतील जागा डॉ. आंबेडकर स्मारकासाठी देण्याचे आश्वासन ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आणखी एक निर्णय फिरविला, भाजप आणि शिवसेनेत बेबनाव वाढण्याची चिन्हे
पुणे : Maharashtra Politics News | राज्य सार्वजनिक रस्ते महामंडळाचा खर्च भागविण्यासाठी मंगळवार पेठेतील महामंडळाची जागा खाजगी विकसकाला साठ वर्षे लीजवर दिल्याचे लेखी उत्तर नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीनच दिवसांपुर्वी विधानसभेत एका प्रश्नावर दिले आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पुणे दौर्यावर असताना आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांना ही जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी देण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आणखी एक निर्णय फिरविल्याची जोरदार चर्चा सुरू असून यावरून भाजप शिवसेनेत बेबनाव वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
राज्य सार्वजनिक रस्ते महामंडळाची ससून हॉस्पीटल समोरील मंगळवार पेठेतील मोक्याची जागा खाजगी विकसकाला लीजवर देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री असताना घेण्यात आला आहे. याला आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांकडून तीव्र विरोध करण्यात येत असून याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक करण्याची मागणी करण्यात येत आहे. यासाठी आंदोलनेही करण्यात आली आहे. तर रविवारी पुणे दौर्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून निवेदनाद्वारे मागणीही करण्यात आली आहे. फडणवीस यांनी जागा स्मारकासाठीच देण्याचे आश्वासन दिल्याचे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माध्यमांना कळविले आहे.
विशेष असे की अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये २१ मार्चला विधानसभेच्या तारांकित प्रश्नावलीमध्ये शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी मंगळवार पेठेतील जागेबाबत विचारला आहे. त्याला नगरविकास मंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे. त्यामध्ये २८ फेब्रुवारी २०२४ मध्ये सदर जागा खाजगी विकसकास ६० कोटी ११ लाख लीज प्रिमियम आकारून तसेच ८. ९० लाख रुपये वार्षिक भाडेपट्टयाने ६० वर्षांसाठी लीजवर दिल्याचे नमूद केले आहे. या जागेचा विकास करण्यास तसेच राज्य रस्ते विकास महामंडळास हस्तांतरीत करण्यास ५ जुलै २०१६ च्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आल्याचे म्हंटले आहे. या निर्णयातील अटी शर्तींनुसार राज्य रस्ते विकास महामंडळाने धारण केलेल्या जमिनीची ११ मे २०१८ च्या अधिसूचनेतील नियमानुसार विल्हेवाट लावल्यानंतर प्राप्त होणार्या उत्पन्नातून भांडवली खर्च भागविण्यासाठी महामंडळाने व्यापारी आणि वाणिज्यिक तत्वावर विकास करून उत्पन्न व आर्थिक लाभ घेण्याकरिता सदर जागा खाजगी विकसकास ६० वर्षे लीजवर देण्यात आल्याचे म्हंटले आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक होईल असे आश्वासन दिल्याने एकनाथ शिंदे यांचा आणखी एक निर्णय फिरवत चांगलाच झटका दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. यातून भाजप आणि शिवसेनेतील बेबनाव आणखीनच वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
