Maharashtra Weather Alert | राज्यात उष्णतेचा जोर वाढला; ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांना यलो अलर्ट, पुण्यातील स्थिती काय?
मुंबई : Maharashtra Weather Alert | मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील तापमानात लक्षणीय वाढ होत असून, अनेक भागांत उष्णतेचा चांगलाच तडाखा जाणवू लागला आहे. दिवसेंदिवस तापमान वाढत असल्याने नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. हवामान विभागाने ५ मार्च रोजी कोकणातील काही जिल्ह्यांसाठी ‘हॉट अँड ह्युमिड’ म्हणजेच उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा दिला आहे. विशेषतः ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात तापमानासोबतच आर्द्रतेचे प्रमाणही जास्त राहण्याची शक्यता असल्याने उकाडा अधिक जाणवू शकतो.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण पट्ट्यात कमाल तापमान साधारण ३२ ते ३७ अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते, तर किमान तापमान २४ ते २७ अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. आर्द्रतेमुळे वातावरण दमट राहणार असल्याने दिवसभर अस्वस्थता जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या कडक उन्हात बाहेर जाणे टाळावे तसेच पुरेसे पाणी पिणे, हलके कपडे वापरणे आणि उष्णतेपासून संरक्षण घेणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले आहे.
मध्य महाराष्ट्रातही तापमान वाढण्याचा अंदाज असून पुण्यासह आसपासच्या जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ ते ३८ अंशांपर्यंत जाऊ शकते. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही उष्ण व कोरडे हवामान राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही ठिकाणी तापमान ३६ ते ३९ अंशांपर्यंत पोहोचू शकते. विदर्भातही उष्णतेची तीव्रता वाढत असून पुढील काही दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
दरम्यान, मार्चच्या सुरुवातीपासूनच तापमानात साधारण २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढ होत असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यात उष्णतेची लाट तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी विशेषतः दुपारच्या वेळेत सावधगिरी बाळगावी, उष्णतेमुळे होणाऱ्या त्रासापासून स्वतःचे संरक्षण करावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
