Maharashtra Weather Alert | राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट; 11 जिल्ह्यांना पावसाचा हवामान खात्याचा इशारा
मुंबई : Maharashtra Weather Alert | राज्यात उन्हाचा चटका वाढू लागलेला असतानाच आता हवामानाने पुन्हा एकदा मोठी कलाटणी घेतली आहे. अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाले असून, भारतीय हवामान विभागाने आज ११ जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज दिवसभरात ताशी ३० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. पावसामुळे वाढत्या उष्णतेपासून नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळणार असला आणि तापमानात २ ते ३ अंशांनी घट होणार असली, तरी हा पाऊस शेतकऱ्यांसाठी मात्र चिंतेचा विषय ठरणार आहे. विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता असून, मराठवाड्यातील नांदेड, लातूर आणि धाराशिवमध्येही विजांच्या कडकडाटासह सरी बरसतील.
मध्य महाराष्ट्राचा विचार करता सोलापूर जिल्ह्याला पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर पुणे आणि कोल्हापूर परिसरात ढगाळ वातावरण राहण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर सध्या उष्णता आणि आर्द्रता कायम असून, १८ मार्चपासून या भागातही हलक्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही.
हा पाऊस १७ ते २० मार्च या काळात राज्याच्या विविध भागात सक्रिय राहू शकतो. या काळात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या रब्बी पिकांची आणि फळबागांची योग्य काळजी घ्यावी, तसेच वादळाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
